
Cash Flow Tips: छोट्या व्यवसायांसाठी कॅशफ्लो का आवश्यक आहे?? वाचा सविस्तर
कोणताही व्यवसाय म्हटलं की कॅशफ्लो राखता येणं महत्वाचं असतं. पैसा राखता आला की सगळ्या गोष्टी व्यवस्थित मॅनेज करता येतात. काय, बरोबर ना? कारण, कॅशफ्लो नीट असला तरच रोजचा व्यवसाय खर्च, भविष्यात ग्रोथ होण्यासाठी गुंतवणूक करणं आणि आलेल्या आर्थिक संकटांवर मात करणं शक्य होऊ शकतं. आणखीही बऱ्याच गोष्टी कॅशफ्लो चांगला राखल्यास सुरळीत चालतात. म्हणून या ब्लॉगमध्ये आपण असे काही आवश्यक उपाय पाहणार आहोत, जे तुमच्या कॅशफ्लोवर नियंत्रण ठेवण्यास कामी येतील.
कॅशफ्लोचा अंदाज काढा..!
तुम्हाला तुमच्या कॅशफ्लोचा अंदाज असणं म्हणजे व्यवसाय सुरळीत चालण्यास मदत होते. यात विशिष्ट कालावधीमध्ये (महिना किंवा तिमाही) अपेक्षित उत्पन्न आणि खर्च समाविष्ट असतो. यामुळे संभाव्य कॅशफ्लोच्या अडचणी लक्षात येतात आणि वेळेवर उपाययोजना करता येतात. तुम्ही तुमचा अंदाज नियमितपणे अपडेट करत राहा, यामुळे तुम्हाला बदलांना त्यात सामावून घेता येईल. तसेच, तुमचे आर्थिक नियोजनही अचूक राहील.
खातेप्राप्तीवर लक्ष ठेवा
ग्राहकांकडून उशीराने पैसे मिळणे हा कॅशफ्लोसाठी मोठा अडथळा ठरतो. यामुळे सर्व नियोजन विस्कळीत होऊन जातं. यासाठी ग्राहकांसोबत आधीच पेमेंट अटी ठरवून घ्या आणि उशीर झालेल्या बिलांचा त्वरित फॉलोअप घेणं सुरू करा. तसेच, वेळेवर भरणा करणाऱ्या ग्राहकांना सूट देण्याचा विचार करा. इनव्हॉइसिंग सॉफ्टवेअर वापरल्यास प्रक्रिया अधिक सुलभ होऊ शकते.
देणी योग्य पद्धतीने सांभाळा
तुमच्या ग्राहकांनी तुम्हाला वेळेवर पैसे द्यावं असं वाटतं. तसेच, तुमच्या सप्लायर्सनाही वाटतं असणार. म्हणून, त्यांना वेळेवर पैसे द्या. कारण, असं न केल्यास तुमच्यातील संबंध बिघडू शकतात. तसेच, ते तुमच्यावर अतिरिक्त चार्ज लावू शकतात किंवा व्याजही घेऊ शकतात. त्यामुळे सप्लायर्सच्या पेमेंट अटी काय आहेत हे आधी समजून घ्या. गरज असेल तेव्हा त्यांच्याशी चर्चा करा आणि जे महत्वाचे सप्लायर्स आहेत त्यांना तारखेनुसार पेमेंट करा. एवढं जरी केलं तरी तुमचा व्यवसाय सुरळीत चालायला कोणतीही आडकाठी येणार नाही.
आपत्कालीन निधी हवाच
छोटा व्यवसाय असल्यास मालकाजवळ कॅश असणं आवश्यक आहे. कारण, अचानक काही खर्च आल्यास किंवा उत्पन्न कमी झाल्यास ही कॅशच तुम्हाला त्यातून बाहेर काढू शकते. त्यामुळे तुमच्या उत्पन्नातील नफा बाजूला काढून तुमच्या व्यवसायाच्या सेव्हिंग खात्यात ठेवणं गरजेचं आहे. याशिवाय खबरदारी म्हणून प्रत्येक व्यावसायिकाने किमान 3 ते 6 महिन्यांचा निधी राखून ठेवणं आवश्यक असल्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.
ऑपरेटिंग खर्चांवर ठेवा नियंत्रण
तुमच्या ऑपरेटिंग खर्चांना नियमित तपासत राहा. यामुळे काही महत्वाच्या बाबींवर लक्ष ठेऊन तुम्ही गुणवत्ता व कार्यकुशलता जपून त्यावरील पैशात कपात करू शकता. यासाठी सप्लायर्सशी दरात सवलतीसाठी वाटाघाटी करू शकता. तसेच, मजुरांचा खर्च कमी करण्यासाठी ऑटोमेशन तंत्रज्ञानाचा वापर करा. यामुळे नफ्यात वाढ होते आणि कॅशफ्लो सुधारण्यास मदत होते.
गरजेच्या वेळीच कर्ज काढा
व्यवसाय म्हटल्यावर पैसा लागतोच. पण, पैसा नसल्यावर काय? हा प्रश्न उद्भवू नये, यासाठी तुम्ही काही पर्याय आधीच तयार करून ठेऊ शकता. यामध्ये व्यावसायिक कर्ज, क्रेडिट लाईन किंवा इनव्हॉइस फायनान्सिंग यापैकी तुमच्या सोयीनुसार तुम्ही पर्याय निवडू शकता. या पर्यायामुळे तुम्ही थोडा मोकळा श्वास घेऊन, पुन्हा व्यवसाय वेग पकडण्याची वाट पाहू शकता.
दोन्ही व्यवहार ठेवा वेगळे
छोट्या व्यावसायिकांकडून होणारी सर्वांत मोठी चूक म्हणजे वैयक्तिक व व्यावसायिक खर्च एकत्रच हाताळणं. पण, तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी वेगळं बॅंक अकाउंट व क्रेडिट कार्ड वापरल्यास उत्पन्न व खर्चाची नोंद करायला सोपं जाते. शिवाय कर भरणं सहज होते आणि तुमच्या व्यवसायाची आर्थिक विश्वासार्हताही वाढते.
कामाची गोष्ट
कॅशफ्लो मॅनेज करणं ही एक सतत सुरू राहणारी प्रक्रिया आहे. ज्यासाठी नियोजन, जागरूकता आणि लवचिकता आवश्यक आहे. हे आपल्या लक्षात आले असेल अशी अपेक्षा आहेत. याचबरोबर वरील टिप्स तुम्ही योग्यरित्या वापरल्यास तुमचं कॅशफ्लो मॅनेजमेंट अधिक भक्कम होऊन तुमचा लहान व्यवसाय दीर्घकालीन यश आणि स्थैर्याच्या दिशेने वाटचाल करेल. यात तिळमात्र शंका नाही..