
व्यवसायाच्या यश प्राप्तीचा राज मार्ग..!
Create A Winning Business Plan : एक चांगल्या पद्धतीने तयार केलेला व्यवसाय प्लॅन तुम्हाला यश प्राप्तीचा मार्गावर घेऊन जातो. तसेच, हे तुमच्या दृष्टी, ध्येय, उद्दीष्टे आणि वित्तीय अंदाजाच्या रुपरेषेला अधोरेखित करतो. त्यामुळे तुमचं सर्वच बाबींकडे बारकाईने लक्ष राहण्यास मदत होते.
तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा तुमचा सध्याचा व्यवसाय वाढवू इच्छित असाल, तेव्हा तुमचा व्यवसाय प्लॅनच तुम्हाला गुंतवणुकदारांना आकर्षित करण्यासाठी, सहज कर्ज प्राप्त करण्यासाठी आणि व्यवसायाचं कामकाज सुरळीत होण्यासाठी महत्वपूर्ण ठरतो. या लेखात आम्ही तुम्हाला एक उत्कृष्ट व्यवसाय योजना कशी तयार करावी, या गोष्टी उलगडून सांगणार आहोत.. जी तुमच्या यशात महत्वाचा वाटा उचलणार आहे..
मार्केट रिसर्च आवश्यक
व्यवसायाची योजना कागदावर उतरवण्याआधी, संपूर्ण मार्केट रिसर्च (Market Resarch) करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आपले टार्गेट मार्केट काय असणार, आपल्या स्पर्धेत कोण आहे आणि सध्या उद्योग क्षेत्रात ट्रेंडिंगमध्ये काय आहे हे समजून घ्यावं लागणार आहे. ही माहिती तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत करणार, शिवाय तुम्ही मार्केटच्या परिस्थितीशी अवगत होणार.. यामुळे तुम्हाला व्यवसाय पुढे कसा न्यायचा याचा एक विश्वसनीय ट्रॅक मिळू शकतो..
काय करणार हे स्पष्ट सांगा..
तुमचे व्हिजन आणि मिशन काय आहे, हे तुमच्या वक्तव्यातून वेळोवेळी सांगा. तुमच्या व्हिजन वक्तव्यातून दीर्घकालीन काय आकांक्षा आहेत, हे दिसून यायला पाहिजे. तसेच, तुमच्या मिशनच्या वक्तव्यातून तुमचा उद्देश आणि तुम्ही इतरांपेक्षा कसं वेगळं आहात, हे दिसून येणंही अपेक्षित आहे. यामुळे तुमच्या व्यवसाय प्लॅनला मजबूत पाया प्राप्त होईल. तसेच, तुमच्या टीमच्या प्रयत्नांना एक योग्य दिशा मिळण्यास मदत होईल..
उद्दीष्टे आधीच सेट करा..
तुमच्या व्यवसायासाठी विशिष्ट (specific), मोजता येण्याजोगे (measurable), साध्य करण्याजोगे (achievable), संबंधित (relevant) आणि वेळेत पूर्ण होणाऱ्या (time-bound) म्हणजेच SMART उद्दीष्टांचा आराखडा तयार करा. मग ते उत्पन्न वाढवणे असो, नवीन मार्केटमध्ये विस्तार करणे असो किंवा नवीन प्राॅडक्ट सुरू करणे असो, स्पष्टपणे परिभाषित केलेली उद्दीष्ट्ये तुमची कामावर मजबूत पकड निर्माण करतील. तसेच, तुम्हाला यशाचा मार्ग प्रदान करतील.
मार्केटिंगचे मजबूत धोरण बनवा..!
तुमच्या मार्केटिंग आणि विक्रीच्या धोरणांचे (Marketing Strategy) तपशीलवार नोट्स तयार करा. तुमचे टार्गेट ग्राहक ओळखा, USP ला (Unique selling proposition) फोकसमध्ये आणा आणि जाहिरातीचा आराखडा तयार करा. तसेच, अधिक लोकांपर्यंत पोहचण्यासाठी मार्केटिंग बजेट तयार करा, योग्य चॅनेल निवडा आणि अचूक रणनीती बनवा.
ऑपरेशन समजून घ्या..!
तुम्हाला तुमच्या व्यवसायाच्या ऑपरेशनची म्हणजेच कामकाजाची सर्व माहिती हवी. तसेच, तुम्हाला संस्थेची रचना, महत्वाचे व्यक्ती आणि त्यांच्या भूमिकेविषयीचा तपशीलही माहिती हवा. याचबरोबर प्राॅडक्शन प्रोसेस, डिस्ट्रीब्युशन चॅनेल आणि अन्य कोणत्याही धोरणात्मक भागीदारीचीही तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. या गोष्टीतून तुमच्या ऑपरेशनची कार्यक्षमता आणि तुम्ही वेळेत काम देऊ शकाल की नाही, हे दिसून येईल.
आर्थिक प्लॅन बनवा..!
अपेक्षित उत्पन्न, खर्च आणि नफा यांचा समावेश असलेली सविस्तर आर्थिक योजना तयार करा. यामध्ये ब्रेक-इव्हन विश्लेषण, कॅश फ्लो स्टेटमेंट आणि विक्रीचा अंदाज समाविष्ट करा. जर शक्य असल्यास, सध्याच्या व्यवसायासाठी मागील काही आर्थिक माहिती डोळ्यांखालून जाऊ द्या. यामुळे तुमच्या व्यवसायातील आर्थिक स्थिरता आणि गुंतवणुकदारांना मिळणाऱ्या अंदाजित नफ्याचा आकडा काढता येऊ शकतो. त्यामुळे हा प्लॅन हाताखाली असणंही महत्वाचं आहे.
रिस्कसाठी तयार राहा!..
व्यवसाय म्हटल्यावर रिस्क (Risk) आणि अडचणी येणारच, त्या ओळखून तुम्हाला त्यावर उपाय शोधावा लागणार आहे. तुमचे स्पर्धक, सरकारी नियम, आर्थिक परिस्थिती किंवा तंत्रज्ञानातील बदल याचा परिणाम व्यवसायावर होणार नाही, याचीही तुम्हाला दक्षता घ्यावी लागणार आहे. समजा असे काही झालेच, तर त्या परिस्थितीवर मात करण्यासाठी तुमच्याजवळ प्लॅन तयार असायला हवा..
तुमच्या टीमचे कौशल्य दिसू द्या..!
कोणत्याही कंपनीची मॅनेजमेंट टीम ही त्या कंपनीचा कणा असते. म्हणून तुमच्या मॅनेजमेंट टीमचे कौशल्य, त्यांची तज्ञता आणि अनुभव अधोरेखित करा. यामुळे तुमच्याकडे एक मजूबत व सक्षम टीम असल्याचा विश्वास गुंतवणूकदार किंवा लेंडर्समध्ये निर्माण होऊ शकतो. यासाठी तुमच्या प्रमुख टीम मेंबर्सचे रेझ्युमे किंवा प्रोफाईल जोडा, यामुळे त्यांची प्रतिभा आणि मिळवलेलं यश दिसून येईल.
आकर्षक हवा कार्यकारी सारांश (Executive Summary)
कार्यकारी सारांश तुमच्या व्यवसाय योजनेचा पहिला विभाग आहे, पण तो शेवटीच लिहिला गेला पाहिजे. या सारांशामध्ये तुमच्या संपूर्ण योजनेचा महत्वपूर्ण भाग असायला पाहिजे, जो वाचकांना आकर्षित करू शकेल. म्हणजेच तो स्पष्ट-सुटसुटीत, आकर्षक आणि प्रभावी असायला हवा. तसेच, यामध्ये व्यवसायातील खास गोष्टी व त्याच्या यशस्वी होण्याच्या शक्यतावरही जोर देणं गरजेचं आहे.
प्लॅन अपडेटवर लक्ष द्या..!
व्यवसायाचा प्लॅन म्हणजे न बदलवता येणारे पेपर्स नव्हे. व्यवसाय प्लॅन हा व्यवसायानुसार तसेच, मार्केटच्या बदलानुसार विकसित होत गेला पाहिजे. म्हणून नवी माहिती, धोरणं आणि ध्येयाच्या पाठपुराव्यासाठी तुमचा प्लॅन नियमितपणे अपडेट व रिव्ह्यू करत राहा. तरच तुम्हाला वेळेनुसार चालण्यास मदत होणार आहे..
कामाची गोष्ट
यशस्वी व्यवसाय प्लॅन तयार करायचा असल्यास रिसर्च, धोरणात्मक विचार आणि योग्य संवाद साधता आला पाहिजे. वर ज्या गोष्टी सांगितल्या आहेत, त्याचे अनुसरण केल्यास तुम्ही एक व्यापक व प्रेरणादायी प्लॅन बनवू शकता. जो तुम्हाला यशाच्या मार्गावर घेऊन जाऊ शकतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. ती म्हणजे व्यवस्थितरित्या बनवलेला प्लॅन फक्त गुंतवणुकदार किंवा लेंडर्सना आकर्षित करत नाही, तर उद्योजकतेच्या प्रवासात महत्वपू्र्ण गाईड म्हणूनही काम करते. त्यामुळे व्यवसाय प्लॅनवर काम होणं आवश्यक आहे…