Startups Growth Goals: स्टार्टअप वाढवताना उद्दिष्टे कशी ठरवावीत? चला जाणून घेऊया..
प्रत्येक स्टार्टअपचं व्यवसाय वाढवण्याचं स्वप्न असतं. पण, योग्य दिशा नसलेली वाढ ही थांबलेल्या व्यवसायाइतकीच धोकादायक ठरू शकते. अनेक नवीन उद्योजक वेग, आकडे आणि प्रसिद्धी मिळवण्याच्या मागे धावताना स्पष्ट आणि वास्तववादी उद्दिष्टं ठरवण्याचं महत्त्व दुर्लक्षित करतात. खरं तर, धोरणात्मक वाढ म्हणजे कोणत्याही परिस्थितीत फक्त विस्तार करणं नाही. तर, प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकत व्यवसायाचा पाया अधिक मजबूत करणं होय. स्टार्टअप्स आणि नवउद्योजकांसाठी योग्य वाढीची उद्दिष्टं ठरवणं खूप महत्त्वाचं असतं, ज्याला ग्रोथ गोल म्हटल्या जाते. कारण योग्य दिशा आणि नियोजन असेल, तर व्यवसाय टिकून राहतो आणि मोठं यश मिळवता येतं. पण अवास्तव अपेक्षा आणि चुकीची धावपळ अनेकदा अपयशाचं कारण ठरू शकते.
सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, ग्रोथ गोल म्हणजे आपला व्यवसाय नेमका कुठे पोहोचवायचा आहे आणि तिथपर्यंत पोहोचण्यासाठी कोणता मार्ग निवडायचा आहे, याचं स्पष्ट नियोजन. हे उद्दिष्ट व्यवसायाला दिशा देतं. कारण, स्टार्टअपच्या सुरुवातीच्या टप्प्यात अनेक संधी आणि कल्पना समोर येत असतात. अशा वेळी ठोस उद्दिष्ट नसल्यास टीम अनेक गोष्टींमध्ये एकाच वेळी लक्ष घालते आणि त्यामुळे वेळ, पैसा आणि ऊर्जा वाया जाते. योग्य पद्धतीने ठरवलेली उद्दिष्टं व्यवसायाला स्पष्टता देतात. कोणत्या गोष्टींवर आत्ता लक्ष केंद्रित करायचं आणि कोणत्या गोष्टी पुढे करता येतील, याचा योग्य निर्णय घेण्यास मदत होते. त्यामुळे व्यवसायाची वाढ अधिक शिस्तबद्ध, परिणामकारक आणि शाश्वत बनते.. चला तर स्टार्टअपला वाढवताना काय गरजेचं आहे, हे समजून घेऊया..
व्यवसायाची सद्यस्थिती माहिती असणं आवश्यक
स्टार्टअपच्या वाढीसाठी योग्य उद्दिष्टं ठरवायची असतील, तर सर्वांत आधी आपल्या व्यवसायाची सध्याची परिस्थिती प्रामाणिकपणे समजून घेणं गरजेचं असतं. आपल्या उत्पादनात नेमकं काय चांगलं आहे, ग्राहकांच्या गरजा काय आहेत, उत्पन्न किती स्थिर आहे आणि टीमची क्षमता किती आहे, याचा स्पष्ट अंदाज असणं महत्त्वाचं आहे. एखाद्या स्टार्टअपने अजून बाजारात स्वतःची ठोस ओळख निर्माण केली नसेल, तर सुरुवातीलाच मोठा विस्तार करण्यापेक्षा ग्राहकांचा विश्वास आणि उत्पादनाची गुणवत्ता मजबूत करण्यावर भर द्यायला हवा. व्यवसाय कोणत्या टप्प्यावर आहे, यानुसार उद्दिष्टं ठरली पाहिजेत; इतरांच्या यशाशी तुलना करून नाही.
प्रगतीसाठी उद्दिष्टं अधिक उपयुक्त
एकदा व्यवसायाची खरी स्थिती स्पष्ट झाली की, पुढची उद्दिष्टं ठोस आणि मोजता येण्यासारखी असणं आवश्यक असतं. “लवकर मोठं व्हायचं” किंवा “मार्केटमध्ये नंबर वन बनायचं” अशा गोष्टी प्रेरणादायी वाटतात, पण त्यातून नेमकी दिशा मिळत नाही. त्याऐवजी ग्राहक टिकवण्याचं प्रमाण वाढवणं, नवीन शहरात विस्तार करणं किंवा मासिक उत्पन्नात वाढ करणं अशी स्पष्ट उद्दिष्टं अधिक उपयुक्त ठरतात. कारण अशी उद्दिष्टं ठरवली की प्रगती मोजता येते, चुका सुधारता येतात आणि योग्य वेळी बदलही करता येतात. यामुळे संस्थापक भावनेत वाहून न जाता वास्तवाशी जोडलेले राहतात.
अल्पकालीन फायद्यांपेक्षा ठेवा दीर्घकालीन दृष्टिकोन
यशस्वी वाढीसाठी अल्पकालीन फायद्यांबरोबर दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवणंही तितकंच महत्त्वाचं आहे. स्पर्धा आणि गुंतवणूकदारांच्या दबावामुळे अनेक स्टार्टअप्स पटकन परिणाम मिळवण्याच्या मागे धावतात. मात्र, तात्पुरत्या यशासाठी घेतलेले काही निर्णय पुढे व्यवसायाला महागात पाडू शकतात. उदाहरणार्थ, विक्री वाढवण्यासाठी उत्पादनाची गुणवत्ता किंवा ग्राहकांचा अनुभव कमी दर्जाचा ठेवला, तर काही काळासाठी आकडे वाढतील; पण दीर्घकाळात विश्वास कमी होईल. शाश्वत वाढ म्हणजे फक्त वेगाने पुढे जाणं नाही, तर व्यवसायातील व्यवस्था, टीम आणि संस्कृती यांना एकत्र घेऊन संतुलित पद्धतीने पुढे जाणं होय.
धोरणात्मक स्केलिंगवर लक्ष करा फोकस
स्टार्टअपच्या वाढीसाठी आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे योग्य प्राधान्यक्रम ठरवणं. कोणत्याही नव्या व्यवसायाकडे वेळ, पैसा आणि माणसं ही मर्यादित प्रमाणात असतात. त्यामुळे एकाच वेळी सगळ्याच दिशांनी वाढ करण्याचा प्रयत्न अनेकदा गोंधळ आणि अकार्यक्षमता निर्माण करतो. धोरणात्मक स्केलिंग म्हणजे अशा काही निवडक गोष्टींवर लक्ष केंद्रित करणं, ज्या व्यवसायावर सर्वाधिक सकारात्मक परिणाम करू शकतात. उदाहरणार्थ, मुख्य उत्पादन अधिक मजबूत करणं, विद्यमान ग्राहकांशी नातं अधिक घट्ट करणं किंवा अंतर्गत कामकाज अधिक व्यवस्थित करणं. अशा लक्ष केंद्रीत प्रयत्नांमुळे टीममध्ये आत्मविश्वास वाढतो आणि बाजारातही विश्वास निर्माण होतो.
ग्रोथसाठी योग्य टीम स्ट्रक्चर आवश्यक
कोणत्याही व्यवसायाच्या वाढीत माणसांची भूमिका सर्वांत महत्त्वाची असते. स्टार्टअप जसजसं मोठं होत जातं, तसतशा संस्थापक आणि टीमसमोरच्या जबाबदाऱ्या आणि अपेक्षाही बदलत जातात. त्यामुळे वाढीची उद्दिष्टं ठरवताना कौशल्यविकास, नेतृत्व क्षमता आणि योग्य टीम स्ट्रक्चर याचाही विचार करणं आवश्यक असतं. स्पष्ट नियोजनाशिवाय खूप वेगाने भरती केल्यास आर्थिक ताण वाढू शकतो आणि कामाची संस्कृतीही बिघडू शकते. दुसरीकडे, टीमच्या विकासाकडे दुर्लक्ष केल्यास व्यवसायाची क्षमता मर्यादित राहते. म्हणूनच, व्यवसायाची उद्दिष्टं आणि टीमची वाढ यांचा समतोल राखणं हे शाश्वत आणि निरोगी प्रगतीसाठी अत्यंत गरजेचं असतं.
नियमित आढावा आहे यशाचा मार्ग
व्यवसायाच्या वाढीसाठी नियमित आढावा घेणंही तितकंच महत्त्वाचं असतं. बाजार सतत बदलत असतो, ग्राहकांच्या गरजा बदलत असतात आणि अनेक अनपेक्षित अडचणीही समोर येत असतात. त्यामुळे वाढीची उद्दिष्टं ही कायमस्वरूपी ठरलेली गोष्ट नसून, परिस्थितीनुसार बदलणारी दिशा असली पाहिजे. वेळोवेळी आढावा घेतल्यामुळे स्टार्टअपला आपल्या निर्णयांमधून शिकता येतं, गरजेनुसार धोरणांमध्ये बदल करता येतात आणि पुढील टप्प्यासाठी अधिक स्पष्ट उद्दिष्टं ठरवता येतात. ही सवय निर्णयक्षमता मजबूत करते आणि व्यवसायाला कठीण परिस्थितीत टिकून राहण्याची ताकद देते.
कामाची गोष्ट
ग्रोथ गोल्स ठरवणं म्हणजे केवळ नियोजन करणं नाही, तर ती एक महत्त्वाची धोरणात्मक जबाबदारी असते. स्टार्टअप्स आणि नवउद्योजकांसाठी ही उद्दिष्टं अनिश्चितता आणि मोठ्या स्वप्नांच्या प्रवासात दिशा दाखवण्याचं काम करतात. योग्य पद्धतीने ठरवलेले ग्रोथ गोल्स व्यवसायात शिस्त, लक्ष केंद्रीत करण्याची सवय आणि संयम निर्माण करतात. अनेकदा वेगाने मोठं होण्याच्या धावपळीत या गोष्टींकडे दुर्लक्ष होतं. पण जेव्हा वाढ स्पष्ट विचार आणि ठोस उद्देशासोबत केली जाते, तेव्हा व्यवसायाची प्रगती केवळ वेगवानच नाही तर शाश्वत आणि अर्थपूर्णही ठरते.