
उद्योजक म्हणून माझा प्रवास
आजघडीला प्रत्येकाला व्यवसाय सुरू करायचा आहे. पण, हे तितके सोपं नाही. यासाठी प्रचंड मेहनत, निष्ठा आणि जोखीम पत्कारावी लागते. एक उद्योजक म्हणून, मला या प्रवासात अनेक गोष्टी शिकता आल्या. ज्यामुळे मला माझा व्यवसाय वाढवता आला. तसेच, प्रभावी नेतृत्व म्हणून पुढे येण्यास मदत झाली. आजपर्यंत या प्रवासात मी काही महत्वाच्या गोष्टी शिकल्या आणि जवळून अनुभवल्या आहेत.. त्याच गोष्टी मी तुमच्याशी या ब्लाॅगद्वारे शेअर करणार आहे...
अपयश आवश्यक..!
उद्योजक होण्याच्या प्रवासात मला सर्वांत महत्वाची गोष्ट शिकता आली, ती म्हणजे अपयश येणं हा शेवट नाही. खरं तर, अपयश म्हणजे काहीतरी नवीन शिकण्याची संधी आहे. जेव्हा मी व्यवसायात उतरलो, तेव्हा माझ्याकडून अनेक चुका झाल्यात. एवढंच काय माझ्या काही आयडियांनीही काम केलं नाही. यामुळे खचून न जाता, मी अपयशाकडे शिकण्याची आणि स्वत:ला घडवण्याची संधी म्हणून पाहिलं.
तसेच, माझ्याकडून काय चुका झाल्या, याचे मी विश्लेषण केले. मग त्यानुसार व्यवसायामध्ये काही महत्वाच्या सुधारणा केल्यात. या अपयशाचा सामना केल्यामुळे मला परिस्थितीशी दोन हात करण्याची, त्यातून मार्ग काढण्याची हिंमत मिळाली. म्हणूनच माझा व्यवसाय आजघडीला मजबूत स्थितीमध्ये असून दिवसेंदिवस वाढत आहेत.
कायम चांगल्या माणसांच्या संगतीमध्ये राहा..
कोणताही उद्योजक एकटा यशस्वी होऊ शकत नाही, ही काळ्या दगडावरची रेष आहे. यशस्वी व्यवसाय उभा करण्यासाठी, तुमच्याजवळ कष्टाळू व प्रामाणिक व्यक्तींची टीम हवी. तसेच, त्यांना तुमच्या ध्येयाची व व्हिजनची पूर्ण जाणीव असणंही गरजेचं आहे. याचबरोबर मी अजून एक गोष्ट शिकलो आहे, ती म्हणजे अशा लोकांच्या संगतीमध्ये राहणं, ज्यांच्याजवळ आपल्यापेक्षा वेगळी कौशल्य आणि क्षमता आहेत.
अशा विविध विचारांच्या आणि तज्ञांच्या संगतीत राहिल्यामुळे मला अचूक निर्णय घेण्यास तसेच, समस्यातून सहज मार्ग काढण्यास खूप मदत झाली आहे. याशिवाय कामावर अशा लोकांना नियुक्त करा, ज्यांना तुमच्या मूल्यांची आणि व्हिजनची जाण आहे. तसेच, तुमच्या मिशनवर काम करण्यास ते उत्सुक आहेत. जेव्हा आपण योग्य लोकांच्या संगतीत असतो, तेव्हा आपण सहकार्य आणि नवीन संस्कृती तयार करत असतो जी तुमच्या व्यवसायाला यशाच्या सर्वोच्च शिखरावर घेऊन जाऊ शकते...
ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवा...
दिवस अखेर, कोणताही व्यवसाय तेव्हाच यशस्वी ठरतो. ज्यावेळी तो व्यवसाय ग्राहकांच्या सर्व इच्छा आणि गरजा पूर्ण करण्याची क्षमता ठेवतो. मी शिकलो की, ग्राहकांवर लक्ष देणं हे महत्वाचं आहे. तसेच, त्यांच्या गरजा आणि इच्छा समजून घेणंही आवश्यक आहे. ग्राहकांनी दिलेल्या अभिप्रायामुळेच मी माझे प्राॅडक्ट्स आणि सेवा सुधारू शकलो. तसेच, ग्राहकांना चांगला अनुभव देऊ शकलो.
आपल्या ग्राहकांशी जिव्हाळ्याचे संबंध तयार करणं आणि त्यांच्याशी आदराने व सहानुभूतीने वागणेही महत्वाचे आहे. जेव्हा तुम्ही ग्राहकांना काय हवंय, काय नको हे बघता. तसेच, त्यांची आदराने विचारपूस करता, तेव्हा तुम्ही एक निष्ठावान ग्राहक तयार करता. जो तुम्हाला तुमचा व्यवसाय असेपर्यंत तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो..
कायम अपडेट राहा..
आज व्यवसायाचे वातावरण प्रचंड तेजीने बदलत आहे. म्हणून या वातावरणाशी एकरूप होण्यासाठी आपल्यालाही तसं राहणं आवश्यक आहे. म्हणजेच प्रसंग कोणताही असो आपल्याला त्यातून पटकन निर्णय घेता आला पाहिजे. तसेच, कोणत्याही परिस्थितीला आत्मसात करून घेता आलं पाहिजे. एक उद्योजक म्हणून पुढे येताना, मी शिकलो की नवीन आयडियांसाठी आणि आवश्यकतेनुसार बदलासाठी आपण तयार असलं पाहिजे.
पटकन निर्णय घेण्याच्या सवयीमुळे बाजारातील बदलांना मी लगेच सामोरे जाऊ शकलो. तसेच, नवीन संधींचा लाभही घेऊ शकलो. याचबरोबर आपल्याला बाजारातील नवीन ट्रेंड आणि तंत्रज्ञानाच्या माहितीसह अपडेट राहायला हवं. सातत्याने नवीन गोष्टी शिकणं आणि कौशल्य आत्मसात करत राहणंही आवश्यक आहे. जेव्हा आपण सर्व काही जाणता, तेव्हा सर्वांच्या पुढे राहू शकता. यामुळे तुमचा व्यवसायही कायम यशाच्या मार्गावरच राहतो…
कामाची गोष्ट..
तसं पाहायला गेलं तर उद्योजक होणं सोपं नाही. मात्र, यामुळे आयुष्यात मोठा आनंददायी बदल होऊ शकतो. अपयशाचा स्वीकार करून, योग्य लोकांना सोबत घेऊन, ग्राहकांना आवश्यक सुविधा पुरवून आणि अपडेट राहून तुम्ही एक यशस्वी व्यवसाय उभा करू शकता. जो या दुनियेत अनेक चांगले बदल घडवून आणू शकतो.
मला आशा आहे की उद्योजक म्हणून माझ्या प्रवासात मी जे काही शिकलो, ते नक्कीच तुम्हाला यशाच्या वाटेवर घेऊन जाईल. लक्षात असू द्या, प्रत्येक प्रवास हा अद्वितीय असतो, तुम्हाला वाटेत संकटांचा सामना करावा लागेल. पण, तुमच्या अंगी चिकाटी, निष्ठा आणि शिकण्याची तयारी असल्यास तुम्ही आयुष्यात काहीही करू शकता..