Must Read This Books : ही ‘5’ पुस्तक यशस्वी उद्योजक होण्याचा मार्ग..!

Blog-img

Must Read This Books : ही ‘5’ पुस्तक यशस्वी उद्योजक होण्याचा मार्ग..!

आजघडीला प्रत्येकाला उद्योजक व्हायचं आहे, यात काही चुकीचं नाही. मात्र, हा प्रवास आव्हानांनी भरलेला असून संधींचाही खजिना आहे. त्यामुळे तुम्ही या प्रवासाला निघाले असल्यास, पाऊल जपून टाकणं फायद्याचे ठरू शकते. आता हेच पाहा, अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरू आहे. पण, ते प्राप्त करायला आपल्याला तेवढा वेळ द्यावा लागणार आहे. मात्र, त्याच मार्गाने जाऊन, एखाद्याने यश मिळवले असल्यास, आपण त्यांच्याकडून त्या गोष्टी शिकून वेळेची बचत व चुका टाळू शकतो. काय, बरोबर ना?  

गेल्या काही वर्षात माझ्या उद्योजकतेच्या प्रवासात मला हे अनुभवता आलं की, काही पुस्तकं उद्योजक होण्याच्या प्रवासात आपल्या मानसिकतेला आकार देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. जसे की, तुमचे नेतृत्व कौशल्य सुधारणं, आर्थिक नियोजनात अव्वल असणं  व नवनवीन आयडियांवर काम करण्यास उद्युक्त करणं या सर्व व अन्यही गोष्टी आपल्याला पुस्तकातून सहज शिकता येतात. त्यामुळे ज्यांना कोणाला आपला व्यवसाय मोठा करायचा आहे, वाढवायचा आहे. त्यांनी मी सांगत आहे ती 5 पुस्तकं वाचायलाच पाहिजे, असं मला वाटतं. चला तर मग त्यांच्याविषयी थोडक्यात जाणून घेऊया..

द लीन स्टार्टअप – एरिक रीस

एक नाही तर अनेक उद्योजक ही चूक करतात. कदाचित तुम्हीही ती केलीच असेल. आता तुम्ही म्हणाल चुका केल्या नाहीतर शिकणार कसं?? हे पण ठीकच आहे. मात्र, कोणताच विचार न करता एखाद्या प्राॅडक्टवर वर्षानुवर्षे काम करणं. तेच प्राॅडक्ट लाँच केल्यानंतर ग्राहकांना त्याची गरजच नसल्याचे समजणे. म्हणजे पूर्ण मेहनत, पैसा व वेळ व्यर्थ जाणार. द लीन स्टार्टअप या पुस्तकाने व्यवसाय वाढीकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन बदलला.

हे पुस्तक ताबडतोब प्राॅडक्टची टेस्ट घेणं, त्यानंतर ग्राहकांचा अभिप्राय कलेक्ट करून, त्यानुसार  त्या प्राॅडक्टची सुधारणा करण्यावर कसा भर द्यायचा. हे अचूक शिकवतं. याचबरोबर, उद्योजक म्हटल्यावर किमान व्यवहार्य उत्पादन (MVP) ही संकल्पना आपल्याला समजून घेता येते. या संकल्पनेमुळे सध्याच्या परिस्थितीमध्ये आपलं नवं प्राॅडक्ट कसं कार्य करेल, हे वास्तविक डेटाच्या आधारे समजून घेता येते. मग त्यानुसार आपल्याला प्राॅडक्टमध्ये सुधारणा करता येते. त्यामुळे तुम्हाला चिरकाल टिकेल असा व्यवसाय तयार करायचा असल्यास, हे पुस्तक तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे..

झीरो टू वन – पीटर थील

आजघडीला प्रत्येक क्षेत्रात जगभर स्पर्धा दिसून येत आहे. त्यामुळे या स्पर्धेच्या युगात टिकून राहायचं असल्यास, दुसऱ्यांच्या यशस्वी मॉडेल्सची नक्कल करून चालणार नाही. हेच मला झीरो टू वनमुळे समजलं. त्यात म्हटलंय की, यश हवंय मग अशी गोष्ट निर्माण करा, जी बाहेर कुठेच नाही. पीटर थील यांचं स्पष्ट मत आहे की, सध्याच्या मार्केटमध्ये स्पर्धा करण्यापेक्षा काहीतरी वेगळं आणि अद्वितीय निर्माण करा. तुमचा व्यवसाय असा हवा, जो बाजारात एक नवीन मूल्य निर्माण करेल आणि तुम्हाला एकप्रकारे मोनोपॉलीसारखा (एकाधिकार) फायदा मिळवून देईल. तुम्ही टेक स्टार्टअप सुरू करत असाल, फिनटेक क्षेत्रात काम करत असाल किंवा पारंपरिक व्यवसाय वाढवत असाल, तर हे पुस्तक तुमचा दृष्टीकोन बदलण्यास व स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यास नक्कीच मदत करेल.

ईट दॅट फ्रॉग! – ब्रायन ट्रेसी

वेळ किती महत्वाची आहे, हे तिचे महत्व जाणणाऱ्यांनाच माहिती असते, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यामुळे तुम्ही जर उद्योजक म्हणून कार्यरत असाल, तर तुम्ही वेळेची किंमत जाणून आहात. कारण, उद्योजक म्हटल्यावर रोजच्या मीटिंग्ज, नवीन ग्राहकांशी भेटी व अन्यही बरेच काम असतात. या सर्व गोष्टीचं व्यवस्थापन करणं, म्हणजेच वेळेचं व्यवस्थापन करणं होय. 

पण, काम कितीही असले तरी सर्वचं महत्त्वाची नसतात.. हेच मला "ईट दॅट फ्रॉग!" या पुस्तकामुळे समजलं. तसेच, कोणत्या कामाला आधी प्राधान्य द्यायचं, कोणते काम टाळायचं आणि कोणते काम पूर्ण करायचं, हेही यामुळे समजायला सोपं गेलं. "ईट दॅट फ्रॉग" या वाक्याचा अर्थ दिवसातील सर्वांत महत्त्वाचे आणि आव्हानात्मक काम पहिल्यांदा पूर्ण करणे, ज्यामुळे इतर सर्व कामे करायला सोपी जातात.

या पुस्तकाने मला शिकवले:

  1. व्यवसायाच्या वाढीस हातभार लावणारी उच्च-मूल्य असणारी कामे कशी ओळखायची.
  2. रोजच्या कामात लक्ष केंद्रित करणं आणि शिस्त पाळण्याचे महत्त्व काय आहे.
  3. विचलितपणा कसा दूर करायचा आणि अधिक स्मार्टरित्या काम कसे करायचे.
  4. जर तुम्हाला कामाचा खूप ताण येत असेल, तर हे पुस्तक प्राॅडक्टीव्हीटी आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी व्यावहारिक रणनीती पुरवण्यास मदत करते.

द हार्ड थिंग अबाऊट हार्ड थिंग्स – बेन होरोविट्झ

एखादी गोष्ट केल्याशिवाय समजत नाही.. दुरून डोंगर साजरे अशीच परिस्थिती उद्योजकांची असते, जेव्हा ते व्यवसायाचा आरंभ करतात. थोडक्यात सांगायचं झाल्यास, जोपर्यंत ते आव्हानांचा सामना करत नाही, तोपर्यंत त्यांना त्याविषयी काहीच माहिती नसते.   

कोणताही उद्योजक व्यवसाय चालवताना येणाऱ्या कठीण आव्हानांसाठी पूर्णतः तयार नसतो, जोपर्यंत तो स्वतः त्यांचा सामना करत नाही. आत्तापर्यंतमी वाचलेल्या पुस्तकांपैकी द हार्ड थिंग अबाऊट हार्ड थिंग्स हे उद्योजकतेवरचे सर्वात भारी पुस्तक आहे. बेन होरोविट्झ केवळ यशाबद्दल बोलत नाहीत; तर ते कठीण निर्णय, अपयश, नेतृत्वाची जबाबदारी आणि आव्हानात्मक परिस्थितीत घेतल्या जाणाऱ्या कठोर निर्णयांबद्दलही सांगतात.

प्रत्येक उद्योजकाला कधीतरी शंका, अडचणी आणि महत्त्वाचे निर्णय घेण्याचा सामना करावा लागतो. हे पुस्तक प्रत्यक्ष व्यवसायातील अनुभवांमधून आपल्याला खूप काही शिकवून जाते. यामध्ये मुख्यता कर्मचाऱ्यांची निवड करण्यापासून ते काढून टाकण्यापर्यंत तसेच, बाजारातील संकटांवर मात करण्यापर्यंतच्या गोष्टींचा समावेश आहे. याशिवाय संघर्ष हा उद्योजकतेचा एक भाग आहे हे समजावून सांगतं, ते या संघर्षांवर यशस्वीपणे मात करण्यासाठी उपयुक्त मार्गदर्शन करते.

रिच डॅड पुअर डॅड – रॉबर्ट कियोसाकी

माझ्या प्रवासात मी दोन भिन्न महत्वाची कौशल्य शिकलो, एक म्हणजे पैसा कसा कमवायचा आणि तो व्यवस्थापित कसा करायचा. रिच डॅड पुअर डॅड या पुस्तकाने मला शिकवले की, आर्थिक यश हे फक्त मोठा पगार मिळवणे नव्हे, तर तुम्ही तुमचे पैसे किती चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करता, गुंतवता आणि वाढवता यावर ठरते.

संपत्ती (assets) आणि कर्ज (liabilities) यातील फरक अनेकांना अजून कळला नाही. त्यामुळे बरचे जण दिलेल्या कर्जांनाच संपत्ती समजतात. हे पुस्तक या दोघांमधील मूलभूत फरक स्पष्ट करते.
स्थिर उत्पन्न (पॅसिव्ह इनकम) हे आर्थिक स्वातंत्र्याचे मार्ग का आहे, हे समजावून सांगते.
गुंतवणूक व आर्थिक निर्णयाद्वारे दीर्घकालीन संपत्ती कशी तयार करायची, हे या पुस्तकातून शिकायला मिळते.

उद्योजक म्हटल्यावर त्यांचं पूर्ण लक्ष व्यवसायाच्या वाढीवरच असते, त्यामुळे वैयक्तिक आर्थिक बाबींकडे त्यांच्याकडून दुर्लक्ष होतं. या पुस्तकाची विशेषता आहे की , हे पुस्तक पैसा कमावण्याविषयीचा दृष्टीकोन बदलते, त्यामुळे आर्थिक स्वातंत्र्य मिळवू इच्छिणाऱ्या प्रत्येक उद्योजकाने हे वाचलेच पाहिजे.

कामाची गोष्ट

पुस्तकांनी नेहमीच माझी सोबत करत, उद्योजकतेच्या प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर योग्य दिशा दाखवली आहे. ही पाच पुस्तके तुम्हालाही योग्य मानसिकता विकसित करण्यास, सामान्य चुका टाळण्यास आणि दीर्घकाळ टिकणारा यशस्वी व्यवसाय उभारण्यास मदत करतील. उद्योजकता म्हणजे केवळ चांगली कल्पना असणे नव्हे, तर ती योग्य ज्ञान आणि रणनीतीसह अंमलात आणणे महत्त्वाचे आहे.

त्यामुळे तुम्ही उद्योजक म्हणून नव्याने सुरुवात करत असाल किंवा व्यवसायाचा विस्तार करण्याच्या तयारीत असाल, तर तुमच्या कौशल्यात वाढ करण्यासाठी तुम्हाला ती आत्मसात करण्यासाठी गुंतवणूक करावी लागणार, असं मला माझ्या अनुभवांवरून वाटतं.

जर तुम्ही खरोखर व्यवसाय वाढ, आर्थिक यश आणि नेतृत्व कौशल्ये विकसित करू इच्छित असाल, तर या पुस्तकांपासून सुरुवात करा. म्हणून मी म्हणेन की, “शिकत राहा, नवनवीन संधी शोधा आणि सर्वांत महत्त्वाचे कधीही थांबू नका, पुढे जात राहा!”


Share On: