Morning Habits:  यशस्वी उद्योजक बनायचंय? दिवसाची सुरुवात अशा पद्धतीने करा

Blog-img

Morning Habits:  यशस्वी उद्योजक बनायचंय? दिवसाची सुरुवात अशा पद्धतीने करा

उद्योजकतेत नशिबान यश मिळणं क्वचितच पाहायला मिळते.. कारण, प्रत्येक यशस्वी व्यवसायामागे सातत्यपूर्ण निर्णय, शिस्तबद्ध कृती आणि हेतूपू्र्ण ठरवलेल्या दिनचर्येची आखणी असते. व्यवसायाची रणनीती, गुंतवणूक आणि नवनवीन कल्पनांना महत्त्वाची भूमिका असली, तरी अनेक यशस्वी उद्योजक आपल्या दीर्घकालीन प्रगतीचं श्रेय ते दिवसाची सुरुवात कशी करतात, यालाही देतात.

सकाळच्या सवयी म्हणजे पहाटे खूप लवकर उठणं किंवा इतर कुणाची दिनचर्या तशीच कॉपी करणं नव्हे. त्याऐवजी, दिवसभरातील आव्हानांसाठी मनाची तयारी करणारी, एकाग्रता वाढवणारी आणि दिवसाची सुरुवात सकारात्मक ऊर्जेने करून देणारी शिस्तबद्ध दिनचर्या तयार करणं महत्त्वाचं आहे. महत्त्वाकांक्षी उद्योजक, स्टार्टअप संस्थापक आणि तरुण व्यावसायिकांसाठी सकाळी उठण्याची सवय लावणं हे त्यांच्या प्रगतीला नवी दिशा देणारं आणि इतरांपेक्षा एक पाऊल पुढे ठेवणारं प्रभावी साधन ठरू शकतं.

दिवसाची सुरुवात करा योग्य नियोजनाने

उद्योजकाची सर्वांत चांगली सवय म्हणजे स्पष्ट नियोजनाने केलेली दिवसाची सुरुवात होय.. मात्र, बरेच जण सकाळी उठल्यावर ई-मेल किंवा सोशल मीडियावरील नोटिफिकेशन्स तपासायला लागतात.  पण,  यशस्वी उद्योजक आपल्या महत्त्वाच्या कामांची यादी तयार करण्यासाठी आधी वेळ काढतात. या साध्या सवयीमुळे महत्त्वाच्या कामांवर लक्ष केंद्रित करायला वेळ मिळतो. दिवसाचा आरंभ करण्यापूर्वी कोणती कामे महत्त्वाची आहेत, हे ठरवल्याने आपल्या उद्दिष्टांच्या दिशेने पोहचणं सोपं होतं.

शारीरिक आरोग्याची काळजी घेणं आवश्यक

दुसरी चांगली आणि महत्वाची सवय म्हणजे रोज शारीरिक आरोग्यासाठी वेळ देणं. हे बहुतेकांना जमत नाही, काही जण याकडे लक्षही देत नाही. मात्र, यशस्वी उद्योजक वेगाने चालणे, स्ट्रेचिंग, योगासने किंवा व्यायाम या गोष्टी नियमित करण्यावर भर देतात. ज्यामुळे त्यांचे शरीर आणि मन दोन्ही ताजेतवाने राहायला मदत होते. शिवाय, शारीरिक हालचालींमुळे एकाग्रता वाढते, तणाव कमी होतो आणि दिवसभर काम करण्याची ऊर्जा मिळते. उद्योजकांना अनेकदा दीर्घकाळ काम करावे लागते आणि मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागतात. त्यामुळे दीर्घकालीन यशासाठी चांगले आरोग्य राखणे, हे उद्योजकासाठी महत्वाची गोष्ट आहे..

रोज नवीन शिकणं महत्वाचं..

प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन शिकणे किंवा नवीन वाचणे ही अनेक यशस्वी उद्योजकांची आणखी एक महत्त्वाची सवय आहे. मार्केट, तंत्रज्ञान आणि ग्राहकांच्या अपेक्षा सतत बदलत असल्यामुळे उद्योजकांना या बदलांशी जुळवून घ्यावे लागते. प्रत्येक दिवशी वीस मिनिटे जरी उद्योगक्षेत्रातील बातम्या, पुस्तके, संशोधनपर लेख किंवा शैक्षणिक माहिती वाचण्यासाठी दिली, तरी बदलत्या परिस्थितीची जाणीव ठेवण्यास आणि भविष्यातील संधींसाठी सज्ज राहण्यास मदत होते. सातत्याने शिकत राहिल्यामुळे ज्ञानात भर पडते आणि निर्णय घेताना आत्मविश्वासही वाढतो.

काही क्षण स्वत:साठी राखणं गरजेचं

यासोबतच, आत्मचिंतनालाही दैनंदिन दिनक्रमात महत्त्वाचे स्थान आहे. अनेक यशस्वी उद्योजक दिवसातील काही शांत क्षण स्वतःसाठी राखून ठेवतात. या वेळेत ते आपल्या दीर्घकालीन ध्येयांचा आढावा घेतात आणि उद्योजकीय प्रवासाला सुरुवात करण्यामागचा उद्देश पुन्हा एकदा आठवतात. या सवयीमुळे दैनंदिन कामाच्या पलीकडे जाऊन आपल्या ध्येयांशी कनेक्ट राहता येते. जेव्हा अडचणी निर्माण होतात, तेव्हा आपल्या मोठ्या उद्दिष्टांची आठवण प्रेरणा देते आणि आव्हानांचा सामना करण्यासाठी मानसिक बळ व जिद्द टिकवून ठेवण्यास मदत करते.

कृतज्ञतेचा भाव जपणं गरजेचं

अनेक उद्योजक आपल्या दिवसाची सुरुवात कृतज्ञतेच्या भावनेनेही करतात. आतापर्यंत मिळवलेले यश, साथ देणारी माणसं आणि उपलब्ध झालेल्या संधी यांची जाणीव ठेवली, तर कामाला सुरुवात करण्यापूर्वीच मनात सकारात्मकता निर्माण होते. कृतज्ञतेची ही सवय  उपलब्ध संधींचा विचार करण्यास प्रवृत्त करते. त्यामुळे समस्यांकडे आशावादी दृष्टिकोनातून पाहणे आणि त्यावर सर्जनशील उपाय शोधणे अधिक सोपे होते. व्यक्तीचा हा सकारात्मक दृष्टिकोन तिच्यासोबत काम करणाऱ्या टीमच्या मनोबलावर आणि कार्यालयातील कामाच्या संस्कृतीवरही प्रभाव टाकतो.

पहिले काम रणनीतीसाठी वेळ काढणे

दिवसातील पहिला तास अनावश्यक अडथळ्यांपासून दूर ठेवणे, हेही अनेक यशस्वी उद्योजकांच्या दिनक्रमाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. सतत येणाऱ्या नोटिफिकेशन्स, मेसेजेस आणि सोशल मीडियावरील अपडेट्स यांमुळे मौल्यवान वेळ आणि मानसिक ऊर्जा सहज खर्च होते. यशस्वी उद्योजकांना हे माहीत असते की, स्वतःचे लक्ष केंद्रित ठेवण्याची क्षमता ही त्यांच्या सर्वांत महत्त्वाच्या साधनांपैकी एक आहे. म्हणूनच, इतरांच्या मेसजना किंवा बाह्य कामांना प्रतिसाद देण्यापूर्वी ते नियोजन, सर्जनशील विचार आणि दीर्घकालीन रणनीतीशी संबंधित कामांसाठी  वेळ राखून ठेवतात.

शिस्ती बनवते इतरांपेक्षा वेगळं

यशस्वी उद्योजकांना इतरांपेक्षा वेगळे ठरवणारी आणखी एक महत्त्वाची सवय म्हणजे स्वत:ला लावलेली शिस्त . प्रेरणा कधी वाढते, तर कधी कमी होते; मात्र चांगल्या सवयी नेहमीच आपल्याला योग्य दिशेने पुढे जाण्यास मदत करतात. दिवसाची सुरुवात ठराविक दिनक्रमानुसार करणारे उद्योजक तणावपूर्ण परिस्थितीतही आपली कार्यक्षमता टिकवून ठेवू शकतात. रोज सातत्याने केलेल्या छोट्या कृती कालांतराने मोठे आणि सकारात्मक परिणाम घडवून आणतात..

समस्यांवर उपाय शोधण्यात हातखंडा..

यशस्वी उद्योजक मानसिक तयारीलाही तितकेच महत्त्व देतात. भविष्यात काय घडेल, याची चिंता करत बसण्याऐवजी ते प्रत्येक दिवसाची सुरुवात समस्यांवर उपाय शोधण्याच्या दृष्टिकोनातून करतात. संभाव्य अडचणींचा आधीच विचार करणे, त्यावर पर्यायी उपाय तयार ठेवणे आणि अनपेक्षित परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याची तयारी ठेवणे, यावर त्यांचा भर असतो. अशा मानसिक तयारीमुळे दबावाच्या परिस्थितीतही शांत राहून विचारपूर्वक निर्णय घेणे शक्य होते आणि दिवसभरातील आव्हानांना अधिक प्रभावीपणे सामोरे जाता येते.

दिनक्रम आपल्या कामानुसार असावा..

यशस्वी उद्योजक होण्यासाठी सकाळचा एकच ठराविक दिनक्रम असावा, असे नाही. प्रत्येक उद्योजकाच्या जबाबदाऱ्या, काम करण्याची ऊर्जा आणि वैयक्तिक आयुष्यातील प्राधान्यक्रम वेगवेगळे असतात. त्यामुळे स्वतःच्या उद्दिष्टांशी सुसंगत आणि दीर्घकाळ सातत्याने पाळता येईल, असा दिनक्रम अधिक प्रभावी ठरतो. दिवसातील महत्त्वाच्या कामांचे नियोजन करणे, व्यायाम करणे, वाचन करणे आणि काही क्षण आत्मचिंतनासाठी देणे अशा साध्या सवयीही नियमितपणे जोपासल्यास मोठे सकारात्मक बदल घडवून आणतात.

कामाची गोष्ट

उद्योजकतेचा प्रवास हा वेगवान शर्यतीपेक्षा मॅरेथॉनसारखा असतो, असे म्हटले जाते. दीर्घकालीन यश मिळवण्यासाठी फक्त नवीन कल्पना आणि धाडसी निर्णय घेणं पुरेसे नसतात, तर दैनंदिन जीवनातील शिस्त आणि सातत्यही तितकेच महत्त्वाचे असते. सकाळच्या सवयी संपूर्ण दिवसाच्या कामाची दिशा ठरवतात. त्या उत्पादकता वाढवण्यास, आव्हानांचा सामना करण्याची क्षमता विकसित करण्यास आणि वैयक्तिक प्रगती साधण्यास मदत करतात. विशेषतः तरुण उद्योजक आणि स्टार्टअप संस्थापकांनी सकाळचा वेळ दिनक्रमासाठी गुंतवणे गरजेचं आहे.. यामुळे  अधिक योग्य निर्णय घेण्यासाठी, प्रभावी नेतृत्व विकसित करण्यासाठी आणि व्यवसायात दीर्घकालीन यश मिळवण्यासाठी मदत होऊ शकते. तसेच, प्रत्येक यशस्वी दिवसाची सुरुवात एका सकारात्मक आणि उद्देशपूर्ण पावलाने होते. सकाळी घेतलेले छोटे-छोटे निर्णयच कालांतराने मोठ्या यशाचा भक्कम पाया बनतात.


Share On: