टेक स्टार्टअप्समुळे आरोग्यसेवा क्षेत्राच्या कक्षा रूंदावल्या..

Blog-img

टेक स्टार्टअप्समुळे आरोग्यसेवा क्षेत्राच्या कक्षा रूंदावल्या..

माणसाच्या आयुष्यातील सर्वांत महत्वाची गोष्ट कोणती असेल तर ती आरोग्य आहे. आरोग्य चांगलं असेल तरच आयुष्याचा प्रवास सुखद होतो.. असं म्हणायला हरकत नाही. कारण, एकदा आरोग्य बिघडले, दवाखान्याची पायरी चढली की, हॉस्पिटलमधल्या लांबलचक रांगा, महागड्या तपासण्या आणि रिपोर्टसच्या प्रतीक्षेत माणूस वैतागून जातो. हा अनुभव आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी अनुभवला असेल.

पण आता परिस्थिती वेगाने  बदलली आहे. आपण झपाट्याने आरोग्य क्षेत्रात पुढे जात आहोत. यासाठी आपल्या सर्वांना टेक क्षेत्राचे आभार मानणं गरजेचं आहे. कारण, या टेक क्षेत्रामुळेच आरोग्य क्षेत्रात क्रांती घडली असून हेल्थकेअर स्टार्टअप मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. यामुळे उपचार जलद व खिशाला परवडणारे होत आहेत. विशेष म्हणजे या सगळ्या गोष्टी रूग्णाला केंद्रस्थानी ठेऊन केल्या जात आहेत.. त्याचा आपल्या आयुष्यात कशा पद्धतीने बदल होत आहे.. हे आपण सविस्तर जाणून घेऊया..  

1. टेक अ‍ॅप्समुळे डॉक्टर थेट घरी

आपण कधी विचार केला होता का की, आपल्याला डाॅक्टरांकडून घरबसल्या उपचार करून घेता येणार आहे. कारण, हे शक्यच नव्हतं. कारण, तशा सुविधा उपलब्ध नव्हत्या. शिवाय एक भीती असायची काही झालं तर काय? आज Practo, Tata 1mg, DocOnline यासारख्या स्टार्टअप्समुळे डॉक्टर व्हिडिओ कॉलवर उपलब्ध आहेत. अगदी छोट्या गावातूनही रुग्णांना सल्ला, प्रिस्क्रिप्शन आणि फॉलोअप घरी बसून घेता येत आहेत. पूर्वी डाॅक्टरांना भेटायचं  म्हटल्यावर सुट्टी घ्या, ट्रॅफिकला चुकवा आणि नंतर क्लिनिकमध्ये नंबर लावून बसा. मात्र, या अ‍ॅप्समुळे अनेकांच्या आयुष्यात मोठा बदल घडला आहे. खासकरून व्यावसायिक, पालक आणि ज्येष्ठांना या सुविधेचा मोठा फायदा होत आहे.

2. डायग्नोस्टिक्स झाले वेगवान व स्मार्ट

आधी ब्लड टेस्ट करायची असो, रिपोर्ट आणायचा असो लॅबला गेल्याशिवाय पर्याय नव्हता. शिवाय रिपोर्टसही लगेच मिळत नव्हते. मात्र, आज Healthians, Thyrocare, Orange Health यासारखे स्टार्टअप्स घरबसल्या सॅम्पल कलेक्शन करून जलद डिजिटल रिपोर्ट देत आहेत.  तसेच, AI स्कॅन्सच्या अधिक अचूक रिडिंगमुळे कर्करोग, हृदयरोग यांसारख्या गंभीर आजारांविषयी आधीच कळायला मदत होत आहे.

सर्व गोष्टी वेळेत आणि मानवी चुका टाळून मिळत असल्याने हे बदल डॉक्टरांना अधिक चांगले निर्णय घेण्यास मदत करत आहेत. शिवाय रुग्णांनाही मानसिक स्वास्थ लाभण्यास मदत करत आहे..

3. स्वस्त औषधं आता एका क्लिकवर

औषधांच्या वाढत्या भावामुळे अनेक कुटुंबाचे कंबरडे मोडले होते. त्यात औषध आणायची म्हटल्यावर थेट मेडिकलवर जावं लागयचं. पण, आता औषधं ऑनलाईन मागवणं सोपं, सुरक्षित आणि फायदेशीर ठरत आहे. कारण, PharmEasy, NetMeds, Medlife  यासारखे अ‍ॅप्स सवलतीमध्ये औषधं घरी पोचवण्यास मदत करत आहेत. 

यामुळे पैशांची बचत तर होतच आहे. शिवाय औषध रिफिल रिमाईंडर्सचं फिचर्स असल्याने रुग्णांना ते लक्षात ठेवण्याचंही टेन्शन नाही. यामुळे बीपी, शुगर किंवा अन्य जुने आजार असणाऱ्यांना सातत्यपूर्ण व तणावमुक्त सेवा थेट घरपोच मिळत आहेत.

4. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे जीवन वाचण्यास मदत..

AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता जो अत्याधुनिक भविष्याचा मार्ग असल्याचा प्रत्यय वेळोवेळी येत आहे. तसे कार्यही AI करत असल्याचं निदर्शनास येत आहे. आरोग्यसेवेतही AI मुळे अनेकांचा जीव वाचवण्यास मदत होत आहे. यासाठी स्टार्टअप्स मोठ्या प्रमाणात वैद्यकीय डेटाचा अभ्यास करून पॅटर्न शोधत आहेत. यामुळे होणाऱ्या आजारांचा धोका आधीच ओळखता येत आहे. उदाहरणार्थ, AI हा  मधुमेहामुळे डोळ्यांवर होणाऱ्या आजारांचे संकेत लक्षणं दिसण्याआधीच शोधू शकतो. म्हणून तंत्रज्ञान डॉक्टरांची जागा घेत नाही. तर यामुळे डॉक्टरांना इलाज करणं अधिक सहज होत आहे.

5. मानसिक आरोग्याला जलद मिळतोय आधार

मानसिक आरोग्यावर आपल्याकडे फारसं मोकळेपणाने बोलल्या जात नाही. विशेष म्हणजे अनेक गैरसमजुतीने या विषयाकडे बघितले जात होते. पण, डिजिटल प्लॅटफॉर्म्समुळे मानसिक आरोग्यासंबंधित मार्गदर्शन सहज मिळू लागलं. यामध्ये YourDOST, Wysa, MindPeers सारख्या स्टार्टअप्सचा समावेश आहे. 

ज्या संपूर्ण गोपनियता पाळून चॅट वा कॉलद्वारे समुपदेशन, थेरपी सेशन आणि भावनिक आधार देत आहेत. याचा फायदा ज्यांच्या मनात सर्वाधिक संघर्ष सुरू असतो त्या विद्यार्थी, नोकरदार व गृहिणींना अधिक होत आहे. तसेच, यामुळे त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल होत आहे..

6. स्टार्टअप्समुळे मिटलं गाव-शहराचं अंतर

आधी दवाखाना म्हटलं की शहराशिवाय पर्याय नव्हता. त्यातही रात्रीची वेळ म्हटल्यावर वाहतुकीचा प्रश्न पडायचा की, शहर गाठायचं कसं?? मात्र, हेल्थ-टेक स्टार्टअप्समुळे  गाव-शहरातील अतंर कमी झालं. त्यामुळे ज्या ठिकाणी डाॅक्टर नाहीत, हॉस्पिटल्स दूर आहेत, अशा ठिकाणी अनेक स्टार्टअप्स आता मोबाईल अ‍ॅप्स, क्लाउड-आधारित रेकॉर्ड्स आणि पोर्टेबल उपकरणं वापरून त्या भागात पोहोचत आहेत. या सुविधांमुळे गावोगावी आरोग्यसेवा सहज पोहचवता येत असून यामुळे भारतीयांना मोठा आधार मिळत आहे.

7. कोविडमुळे आरोग्य क्षेत्राला आली गती 

कोविड-१९ मुळे जगाला आरोग्यसेवेचा खऱ्या अर्थानं विचार करणं भाग पडले. कोविडमुळेच भारतात टेलीकन्सल्टेशन, ऑनलाईन फार्मसी आणि डिजिटल हेल्थ रेकॉर्ड्स यासारख्या आरोग्याशी संबंधित गोष्टींची झपाट्याने वाढ झाली.
 
तसेच, अनेक  स्टार्टअप्सने ऑक्सिजन ट्रॅकिंग, हॉस्पिटल बेड्सची उपलब्धता, लसीकरण अलर्ट्स, सिम्प्टम चेकर अशा अनेक नवकल्पना आणल्या. तसेच, स्टार्टअप्समुळे एक गोष्ट समजली की, योग्य तंत्रज्ञान व हेतू चांगला असला की मोठी सिस्टिमही अधिक प्रतिसादक्षम आणि रुग्ण-केंद्रित होऊ शकते.

कामाची गोष्ट..

आरोग्यसेवा आता खूप वेळखाऊ, गुंतागुंतीची किंवा महागडी न होता सरसकट उपलब्ध होत आहे. यासाठी आपल्याला  टेक स्टार्टअप्सचे आभार मानने आवश्यक आहे. कारण, त्यांच्यामुळेच ती वेगवान, सोयीस्कर आणि अधिक कार्यक्षम बनत आहे. पण, ही फक्त सुरूवात आहे.  भविष्यात वैयक्तिकृत उपचार, वेअरेबल हेल्थ ट्रॅकर्स, व्हर्च्युअल शस्त्रक्रिया आणि अजून न उलगडलेल्या नवकल्पना आपल्या प्रतीक्षेत आहेत.


Share On: