How Startups Work: यशस्वी व्हेंचरचं बिझनेस माॅडेल माहिती आहे?? चला पाहूया..
आजच्या वेगवान व्यावसायिक जगात, स्टार्टअप्स नवकल्पना आणि आर्थिक वृद्धीचे शक्तीशाली वाहक बनले आहे. पण प्रत्येक यशस्वी स्टार्टअप फक्त चांगली आयडिया घेऊन येत नाही. तर त्यामागे काळजीपूर्वक तयार केलेले व्यवसाय मॉडेल, ग्राहकांच्या गरजा याचं सखोल आकलन आणि वाढीसाठी पुढचं स्पष्ट धोरण असतं. तुम्ही एक उदयोन्मुख उद्योजक असाल, स्टार्टअपमध्ये काम करत असाल किंवा स्टार्टअप्सच्या यशामागील रहस्य जाणून घेण्यास उत्सुक असाल, तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात.. कारण, या लेखात आपण स्टार्टअपच्या यशाच्या मूलभूत तत्वांचा शोध घेणार आहोत.. चला, तर मग ते समजून घेऊया.
1. लोकांच्या गरजा ओळखून बनवा प्राॅडक्ट..
कोणत्याही स्टार्टअपचा आरंभ करण्यापूर्वी मार्केटमध्ये खरंच सोडवण्यासाठी एखादी समस्या आहे का हे पाहणं गरजेचं असतं. विशेष म्हणजे कोणत्याही यशस्वी स्टार्टअपच्या केंद्रस्थानी मार्केट व्हॅलिडिटी या प्रक्रियेचं चेकपाॅईंट असतेच. म्हणजेच ग्राहकांना एखादं उत्पादन (प्राॅडक्ट )गरजेचं असल्यास तेच मार्केटमध्ये लाॅंच करता येते.
म्हणून अंदाजांवर आधारित प्राॅडक्ट बनवण्याऐवजी, स्टार्टअप्स सुरुवातीलाच संभाव्य युझर्सकडून सक्रियपणे अभिप्राय घेतात. यामध्ये सर्वेक्षण करणे, पायलट व्हर्जन लाॅंच करणे तसेच, वास्तविक-जगातील इनसाईट गोळा करण्यासाठी किमान व्यवहार्य उत्पादने (Minimum Viable Products - MVPs) तपासणीचा समावेश असतो.
उद्देश साधा आहे: तुम्हाला जे वाटते ते बनवू नका, लोकांना ज्याची गरज आहे ते बनवा. जर अभिप्रायामध्ये काही त्रुटी आढळल्या किंवा नवीन संधी दिसल्या, तर स्टार्टअप्स त्वरित पिव्होट करतात.. म्हणजेच जोपर्यंत ते योग्य लक्ष्य साधत नाहीत, तोपर्यंत त्यांच्या ऑफरमध्ये बदल करतात.
2. यशस्वी व्यवसाय मॉडेल्सचा शोध
सर्व स्टार्टअप्स कमाईसाठी एकाच मार्गाचा अवलंब करत नाहीत. यशस्वी उद्योगांना वेगळे ठरवणारी गोष्ट म्हणजे ते त्यांच्या प्राॅडक्टनुसार, मार्केटनुसार आणि ग्राहकांच्या व्यवहारानुसार योग्य व्यवसाय मॉडेल निवडतात. काही सामान्य स्टार्टअप मॉडेल्स खालीलप्रमाणे आहेत:
सब्सक्रिप्शन बेस्ड: युझर्स प्राॅडक्ट किंवा सेवेमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी मासिक किंवा वार्षिक आधारावर नियमित पेमेंट करतात. (उदा. स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म).
फ्रीमियम : मूलभूत व्हर्जन मोफत असते, परंतु डेव्हलप फीचर्ससाठी शुल्क आकारले जाते. (उदा. सॉफ्टवेअर स्टार्टअप्स).
ऑन-डिमांड : ग्राहकांना आवश्यक असेल तेव्हा सेवा किंवा उत्पादने दिली जातात, जी अनेकदा ॲपद्वारे उपलब्ध असतात. (उदा. राइड-शेअरिंग ॲप्स).
प्राॅडक्ट किंवा सर्व्हिस सेल्स : ग्राहकांना थेट प्राॅडक्ट किंवा सेवा देणे. यात कनझ्युमरसह व्यावसायिकांचाही समावेश असतो.
रिसेलर: स्टार्टअप्स इतर कंपन्यांकडून वस्तू किंवा सर्व्हिस खरेदी करून नफ्यावर विकतात. (उदा. ई-काॅमर्स किंवा टेक सोल्युशन)
एग्रीगेटर : स्टार्टअप मल्टीपल सेवा देण्यासाठी अनेक सेवा पुरवठादारांना किंवा डेटा स्रोतांना एकत्र आणते. (उदा. प्रवास बुकिंग प्लॅटफॉर्म व फूड डिलिव्हरी).
व्हेंचर स्टुडिओ : एक संरचित मॉडेल जिथे एकच संस्था अनेक स्टार्टअप्स तयार करते आणि लॉन्च करते. विशेष म्हणजे त्यांना टेक्नाॅलाॅजी, फंडिंग व योग मनुष्यबळ पुरवण्यास मदत करते..
योग्य मॉडेल निवडणे म्हणजे फक्त कमाई करणं नव्हे, यामुळे ग्राहकांच्या सवयींशी जुळवून दीर्घकालीन शाश्वतता निर्माण करणे होय.
3. वाढ करणे जलद विकासाचा मार्ग
यशस्वी स्टार्टअप्सचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे कमी खर्चामध्ये जलद गतीने वाढ करण्याची त्यांची क्षमता होय. तसेच, स्केलेबिलिटी म्हणजे फक्त युझर्सना जोडणे नव्हे, तर ते काम अतिशय कुशलतेने करणे होय.
या सर्व प्रक्रियेत डिजिटल साधने आणि प्लॅटफॉर्म महत्वाची भूमिका बजावतात. क्लाउड-आधारित पायाभूत सुविधांपासून ते स्वयंचलित मार्केटिंग आणि ग्राहक सेवा साधनांपर्यंत, तंत्रज्ञान स्टार्टअप्सना त्यांचे खर्च मोठ्या प्रमाणात न वाढवता मोठ्या प्रेक्षकांना सेवा देण्यास मदत करते.
स्केलेबल स्टार्टअप्स अनेकदा छोट्या स्तरावरुन आरंभ करतात. मात्र, त्यांची रचना भविष्यातील वाढीला लक्षात घेऊनच केलेली असते. त्यामुळे मागणीनुसार विस्तारू शकतील अशा प्रणाली, प्रक्रिया आणि उत्पादने डिझाइन करण्याची त्यांची क्षमता असते.
4. संसाधनांचे स्मार्ट वाटप
मोठ्या कॉर्पोरेशन्सच्या विपरीत, स्टार्टअप्स अनेकदा मर्यादित भांडवल व मनुष्यबळाने आरंभ करतात. पण, त्यांच्याजवळ ज्या गोष्टी असतात, त्यांचा धोरणात्मक वापर करण्यात ते तरबेज असून हीच गोष्ट त्यांना वेगळे ठरवते. काही स्टार्टअप्स व्हेंचर स्टुडिओ किंवा स्टार्टअप इनक्यूबेटर्स सोबत सहयोग करतात, जे सामायिक पायाभूत सुविधा जसे की, ऑफिस, तांत्रिक टीम, कायदेशीर सल्ला पुरवतात. तर काही स्टार्टअप्स भागीदारीवर लक्ष केंद्रित करतात, ज्यामुळे त्यांना नवीन मार्केटमध्ये सहज प्रवेश मिळतो किंवा त्यांच्या विकासाचा खर्च कमी होतो.
कार्यक्षमता ही गुरुकिल्ली आहे. त्यामुळे प्रत्येक तास, प्रत्येक रुपया आणि प्रत्येक निर्णय स्टार्टअपच्या ध्येयांसाठी अर्थपूर्ण योगदान देणारा असणं आवश्यक आहे.
5. यशस्वी स्टार्टअपचे मुख्य घटक
व्यवसाय मॉडेल आणि तंत्रज्ञान महत्त्वाचे असले तरी, स्टार्टअपचे यश अनेकदा खालील मुख्य घटकांवर अवलंबून असते:
मजबूत प्राॅडक्ट: वास्तविक समस्या सोडवून ग्राहकांना स्पष्ट मूल्य प्रदान करते.
मार्केटचं धोरण : टार्गेट प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांना आकर्षित करण्यासाठी चांगली योजना बनवणं. त्यात किंमत, त्याचं वितरण आणि अचूक मेसेजचाही समावेश असणं महत्वाचं असतं.
संघटनात्मक संस्कृती : नवकल्पना आणि सहकार्याचे मूल्य जपणारी टीम बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी अधिक सुसज्ज असते.
निधी : स्वतःच्या भांडवलावर असो किंवा गुंतवणूकदारांच्या पाठिंब्यावर, भांडवलाची उपलब्धता स्टार्टअपला कामं टिकवून ठेवण्यासाठी आणि योग्य वेळी ते वाढवण्यासाठी मदत करते.
यापैकी प्रत्येक घटक इतरांना पाठींबा देतो, ज्यामुळे दीर्घकालीन यशाचा पाया तयार होण्यास मदत मिळते.
6. 'लीन स्टार्टअप' कडे अनेकांचा कल..
स्टार्टअप्सकडे वेळेची किंवा अमर्याद बजेटची सोय नसते. म्हणूनच अनेकजण'लीन स्टार्टअप' पद्धतीचा अवलंब करतात, जे खालील गोष्टींवर जोर देते:
किमान व्यवहार्य उत्पादन (MVP) तयार करणे: उत्पादनाचे (Product) छोटे व्हर्जन, जी सुरुवातीच्या चाचणीसाठी उपयुक्त ठरते.
अभिप्राय तपासणे: काय काम करत आहे आणि काय नाही हे तपासण्यासाठी वास्तविक युझर्सकडून माहिती गोळा करणे.
शिकणे आणि पुनरावृत्ती करणे : अभिप्रायाच्या आधारावर सुधारणा करुन प्राॅडक्टमध्ये त्यानुसार बदल घडवत राहणे.
हा कल धोका कमी करतो आणि स्टार्टअप्सला अशी वैशिष्ट्ये किंवा सेवा तयार करणे टाळण्यास मदत करतो, जी युझर्संना आवडत नाहीत.
7. पुढचं नियोजन: धोरण आणि दूरदृष्टी
शेवटी, यशस्वी स्टार्टअप्स स्पष्ट व्यवसाय योजना विकसित करतात. ही केवळ गुंतवणूकदारांसाठी नसून ती एक रोडमॅप म्हणून कार्य करते, जी टीमला केंद्रित आणि एकत्रित ठेवायला मदत करते..
एका सामान्य व्यवसाय योजनेत या गोष्टींचा समावेश असतो:
- समस्येच निराकरण करणं
- टार्गेट ग्राहक
- स्पर्धेचे स्वरूप
- महसूल मॉडेल
- मार्केटिंग आणि वाढीचं धोरणं
- आर्थिक अंदाज
स्टार्टअप्सचं काम वेगवान असलं तरी, स्पष्ट दिशा असल्यामुळे प्रत्येक निर्णय धोरणात्मक आणि उद्देशपूर्ण असतो. याचबरोबर स्टार्टअप्सचं मुख्य कामचं समस्या सोडवण्यासाठी झाले आहे. सर्वात यशस्वी स्टार्टअप्स फक्त उत्पादने लॉन्च करत नाहीत तर ते वास्तविक मार्केटमधील गरजा शोधून त्यावर अचूक उपाय देतात.. ते नाविन्यपूर्ण व्यवसाय मॉडेल व कार्यक्षम प्रणालीचा अचूक वापर करून ग्राहकांना परवडेल अशा सुविधा आणण्यावरच लक्ष केंद्रित करतात..
जर तुम्हीही स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा विचार करत असाल किंवा मोठ्या स्टार्टअप्सना कोणती गोष्ट वेगळे करते हे समजून घेऊ इच्छित असाल तर या मूलभूत तत्त्वांवर लक्ष केंद्रित करा. जर तुमच्या अंगी स्पष्टता, धोरण आणि योग्य मानसिकता असल्यास यशस्वी स्टार्टअप बनवणं अधिक शक्य आहे..
— अभिनाथ माणिकराव शिंदे