Fintech Startup: … म्हणून फिनटेक स्टार्टअप्स हेच बँकिंगचे भविष्य..!
आधी बॅंकेतून पैसे काढायचे म्हटल्यावर रांगेत उभं राहिल्याशिवाय पर्याय नव्हता. मात्र, मागील दशकात टेक्नाॅलाॅजीमुळे सर्व चित्र बदललं आहे. फक्त एका क्लिकवर बिल भरण्यापासून ते स्मार्टफोनद्वारे गुंतवणूक करण्यापर्यंत फिनटेकने बॅंकिंग क्षेत्राचं स्वरूपच बदलवून टाकलं आहे. हे आपण पाहत आहोत. यामुळेच आपल्या देशात डिजिटलचा वापर झपाट्याने वाढत असून फिनटेक स्टार्टअप्स भविष्याची गती निश्चित करण्यात महत्वाची भूमिका निभावत आहे. यामध्ये सर्वच स्तरातील नागरिकांचा समावेश आहे. मग तुम्ही कॉलेजचे विद्यार्थी असा, छोटे व्यावसायिक असा किंवा मध्यमवर्गीय असा या फिनटेकच्या नवीन बदलांमुळे बँकिंग अधिक सुलभ आणि ग्राहक केंद्रित बनत आहे.
चला, तर मग फिनटेक स्टार्टअप्स हे गेम-चेंजर (Game-Changer) कसे आणि का ठरत आहेत, हे आजच्या लेखात पाहूया.
1. अधिक चांगला बँकिंग अनुभव
पारंपरिक बँकिंगमध्ये अजूनही तुम्हाला रांगेत उभं राहावं लागेल, ठरलेली कार्यालयीन वेळ पाळावी लागेल आणि काही आवश्यक कागदपत्रांचा वापर करावा लागेल. मात्र, फिनटेक स्टार्टअप्सने या गोष्टी कालबाह्य करत डिजिटल सोल्यूशन उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे बॅंकिग सहज आणि परवडणारी होण्यास मदत झाली आहे.
सोयीनुसार करा गुंतवणूक
फिनटेक प्लॅटफॉर्म्स युझर्सच्या सवयींचे विश्लेषन करून त्यानुसार सेवा देतात. यामध्ये Groww आणि ETMoney या ॲप्सचा समावेश आहे. जे आपल्याला मुलांच्या शिक्षणासाठी पैसा जमा करायचा असो किंवा सुट्टीची योजना करायचे असो. त्यानुसार तुम्हाला गुंतवणुकीच्या योजना सुचवतात.
सहज व्यवहार शक्य
अनेक फिनटेक ॲप्स UPI द्वारे थेट तुमच्या बँक खात्याशी जोडलेले असतात. ज्यामुळे तुम्ही प्लॅटफॉर्म न बदलता पेमेंट
करू शकता, खर्च ट्रॅक करू शकता किंवा कर्जासाठी अर्ज करू शकता.
सेवा नेहमी उपलब्ध
बॅंकेच्या शाखांची वेळ ठरलेली आहे. त्यानंतर त्या बंद होतात. मात्र, फिनटेकची सेवा शक्यतो बंद पडत नाही. तुम्ही कधीही अन् कुठूनही बिल भरू शकता, गुंतवणूक करू शकता किंवा बॅलन्स चेक करू शकता. त्यामुळे फिनटेक तुम्हाला नेहमी उपलब्ध आहे.
2. अधिक कार्यक्षमता, कमी खर्च
आपल्या बजेटमध्ये असणाऱ्या म्हणजेच परवडणाऱ्या गोष्टींसाठी भारतीय ग्राहकांची अधिक पसंती असते. फिनटेक स्टार्टअप्स ऑटोमेशन आणि स्केलेबिलिटीद्वारे खर्च कमी करून ही बचत ग्राहकांपर्यंत पोहोचवत आहेत.
प्रक्रिया सहज व जलद
आधी KYC व्हेरिफाय करण्यासाठी किंवा कर्ज मंजूरीसाठी अनेक प्रक्रियामधून जावे लागत होते. यामुळे ही प्रक्रिया अधिक वेळखाऊ होती. पण, आता AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून काही मिनिटांत पूर्ण करता येत आहे..
सेवेत बदल नाही होत
डिजिटल प्लॅटफॉर्म्सना भौतिक शाखांची मर्यादा नसते. त्यामुळे १०० युझर्स असो किंवा १ कोटी त्यांना सेवा देताना अनुभवात कोणताही बदल होत नाही, सेवा वेगवान आणि विश्वसनीयच राहते.
उच्च शुल्कांना करा अलविदा..
जेथे पारंपरिक बँका अनेकदा देखभाल शुल्क किंवा व्यवहार शुल्क आकारतात. तिथे Niyo आणि Paytm Payments Bank सारख्या फिनटेक स्टार्टअप्स झिरो-बॅलन्स अकाउंट, त्वरित वेतन जमा करण्याची सुविधा आणि किमान शुल्क आॅफर करत आहेत.
3. प्रत्येकासाठी आर्थिक सुविधा
भारतासमोरील सर्वांत मोठे आव्हान आर्थिक समावेशनाचं आहे. कारण, ग्रामीण भागासह लाखो लोकांना अजूनही पारंपरिक बँकांकडून पुरेशी सेवा मिळत नाही. मात्र, फिनटेक स्टार्टअप्स ही दरी कमी करत आहेत.
स्टार्टअपमुळे अनेकांना सेवा उपलब्ध
केवळ स्मार्टफोन आणि आधार कार्डच्या मदतीने आता युझर्स डिजिटल खाती उघडू शकत आहेत. याचबरोबर मायक्रोलोनसाठी अर्जही करू शकत आहेत. विशेष म्हणजे यासाठी कागदपत्रे घेऊन बँकेच्या शाखांना भेट द्यायची गरज नाही.
सेवा पोहचल्या दुर्गभ भागात
इंटरनेट आणि मोबाईल प्लॅटफॉर्मच्या सहज उपलब्धतेमुळे फिनटेक सेवा आता दुर्गम शहरे आणि गावांपर्यंत पोहोचल्या आहेत. जन धन योजनांसारख्या सरकारी उपक्रमांनी यासाठी पाया तयार केला आणि स्टार्टअप्स त्यावर आधुनिक बँकिंगची इमारत उभारत आहेत.
4. नवीन तंत्रज्ञानासह नवकल्पनांना गती
काही वर्षांपूर्वी ज्या गोष्टींचा आपण विचारही करू शकत नव्हतो, फिनटेक अशी साधनं आणि मॉडेल्स घेऊन येत आहे. ज्यामुळे उद्योगांच्या सीमा विस्तारायला मदत होत आहे..
डिजिटल वॉलेट्स आणि UPI
भारत डिजिटल पेमेंट्समध्ये जागतिक लिडर बनला आहे. PhonePe, Google Pay आणि BharatPe सारख्या प्लॅटफॉर्म्समुळे पैसे पाठवणे आता मेसेज पाठवण्याइतके सोपे झाले आहे.
क्रिप्टो आणि ब्लॉकचेन
जरी संकल्पना अजूनही विकसित होत असली तरी, सुरक्षित आणि पारदर्शक आर्थिक व्यवहारांसाठी ब्लॉकचेनची चाचणी घेतली जात आहे. ज्यामुळे भविष्यासाठी नवी दिशा तयार होत आहे.
AI सह अधिक स्मार्ट
फसवणूक ओळखण्यापासून ते वैयक्तिकृत गुंतवणूक सल्ल्यापर्यंत, AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) फिनटेक ॲप्सना आर्थिक सल्लागाराप्रमाणे काम करण्यास सक्षम करत आहे.
5. बँकांसोबत वाढली भागीदारी
फिनटेक स्टार्टअप्स बँकांना पूर्णपणे बदलून टाकण्याऐवजी त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात भागीदारी करत आहेत. यामुळे युझर्सना जलद व विश्वसनीय सेवा मिळण्यास मदत होत आहे..
फिनटिग्रेशन काळाची गरज..
फिनटेक व बॅंकाच्या एकत्रीकरणाने सध्या मोठा धुमाकूळ घातला आहे. कारण, बँकांना फिनटेकच्या नवकल्पनांचा फायदा मिळत आहे, तर फिनटेक कंपन्यांना बँकांच्या मजबूत पायाभूत सुविधांचा आणि ग्राहकांच्या विश्वासाचा लाभ मिळत आहे. ICICI बँक आणि PhonePe तसेच HDFC बँकेचे विविध फिनटेक लेंडिंग प्लॅटफॉर्म्ससोबतचे करार हे या ट्रेंडिंगचे सर्वोत्तम उदाहरण आहेत.
ओपन बँकिंगचा उदय
ओपन बँकिंग API मुळे (ग्राहकांच्या संमतीने), फिनटेक ॲप्स सुरक्षितपणे बँक डेटा ॲक्सेस करू शकतात. ज्यामुळे युझर्सना त्यांची सर्व खाती एकाच ठिकाणी ट्रॅक करता येतात किंवा अधिक चांगले बचत पर्याय शोधता येतात.
बँकिंगचे भविष्य
फिनटेक क्रांतीचा मुख्य उद्देश म्हणजे ग्राहकांच्या गरजांना प्राथमिकता देणे आहे. तसेच, लोकांचे त्यांच्या पैशांवर अधिक नियंत्रण, पारदर्शकता आणि आर्थिक निर्णयांबाबत अधिक आत्मविश्वास निर्माण करणं आहे. कारण, भारत हा निर्मात्यांचा, डिजिटल उद्योजक आणि कष्टकऱ्यांचा देश आहे. त्यामुळे भारतामध्ये डिजिटल क्रांतीने योग्य वेळ साधली आहे.
फिनटेक स्टार्टअप्स जसजसे विकसित होत आहेत, ते फक्त बँकिंग बदलत नाहीत. तर नव्या पिढीसाठी आर्थिक सक्षमीकरणाची नवी व्याख्या तयार करत आहेत.
लेखकाविषयी
मा. श्री. अभिनाथ माणिकराव शिंदे हे एक सामाजिक उद्योजक आणि इंडिफ्लाय ग्रुपचे सह-संस्थापक आहेत. फिनटेक, डिजिटल सोल्यूशन्स आणि सामाजिक क्षेत्रात नाविन्यपूर्ण परिवर्तन घडविणारे व्हेंचर बिल्डर म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला आहे.
गेल्या सलग दहा वर्षांपासून नेतृत्वाची धुरा यशस्वीपणे सांभाळण्याच्या अनुभवामुळे त्यांनी अनेक तंत्रज्ञान-आधारित व्यवसाय उभे केले आहेत. या माध्यमातून, समाजाला सक्षम बनवण्यावर आणि आर्थिक संधींचा विस्तार करण्यावर त्यांनी नेहमीच लक्ष केंद्रित केले आहे.