Financial Literacy : … म्हणून नवीन उद्योजकांसाठी आर्थिक साक्षरता आहे महत्वाची

Blog-img

Financial Literacy : … म्हणून नवीन उद्योजकांसाठी आर्थिक साक्षरता आहे महत्वाची

Financial Literacy : … म्हणून नवीन उद्योजकांसाठी आर्थिक साक्षरता आहे महत्वाची

आर्थिक साक्षरता' हा शब्द उच्चारला की, काही लोकांचं डोक आपोआप जड पडत. पण, हेच ते शब्द आहेत, जे तुम्हाला पैसा काय आहे हे समजावून सांगतात. त्यामुळे तुम्ही सामान्य माणूस असा की उद्योजक आर्थिक साक्षरतेविषयी समजून घेण गरजेचं आहे. कारण, व्यवसायात यशस्वी व्हायचं असल्यास आर्थिक निर्णय घेता आले पाहिजे. म्हणून आज मी तुम्हाला आर्थिक साक्षरतेचं महत्व सांगणार आहे.. चला तर मग जाणून घेऊया..

विचारपूर्वक निर्णय घेण्याची क्षमता

उद्योजक म्हणून तुम्हाला सातत्याने बजेटिंग, गुंतवणूक, कॅश फ्लो आणि नफा यासंदर्भात निर्णय घ्यावे लागतात. आर्थिक साक्षरता तुम्हाला तुमच्या व्यवसायाची आर्थिक स्थिती अचूकपणे समजून घेण्यास मदत करते. त्यामुळे अनावश्यक खर्च, चुकीचं नियोजन यासारख्या चुका टाळता येतात आणि व्यवसायाची गाडी सुरळीत मार्गावर ठेवता येते.

कॅश फ्लोचं अचूक व्यवस्थापन

बऱ्याच स्टार्टअप्स अपयशी होतात यामागचं एक मोठं कारण म्हणजे कॅश फ्लो व्यवस्थित राखण्यात आलेलं अपयश होय. देणी-घेणी, मासिक खर्च आणि फंडचे नियोजन याबाबतची नीट समज असल्यास तुम्ही व्यवसायाला सुरळीत चालवू शकता. आर्थिक साक्षरता ही चढ-उतारांच्या काळात सुद्धा व्यवसाय टिकवून ठेवण्याची ताकद देते.

गुंतवणुदारांकडून फंड मिळवणं होतं सहज

गुंतवणुकदार अशा उद्योजकांच्या शोधात असतात,  ज्यांना आर्थिक गणित समजतं. त्यामुळे आर्थिक साक्षरतेमुळे तुम्ही त्यांना दाखवू शकता की, त्यांच्या भांडवलाचा योग्य वापर करून तुम्ही नफा कमावू शकता. यामुळे तुमची क्रेडिबिलिटी वाढतं आणि तुम्हाला फंड मिळवणं अधिक सोपं होतं.

आर्थिक धोका ओळखता येतो

प्रत्येक उद्योग व्यवसायात धोके (RISK) असतात. मात्र, तुम्ही जर आर्थिक साक्षरतेचं कौशल्य आत्मसात केल्यास हे धोके ओळखून त्यासाठी रणनीती आखता येते. तसेच, फायनान्शीयल रेशो, मार्केट ट्रेंड्स, आर्थिक निर्देशांक समजून घेऊन, तुम्ही संभाव्य संकटांवर मात करून तुमचा व्यवसाय वाढवू शकता.

दीर्घकालीन यशासाठी आवश्यक

व्यवसाय सुरू केला म्हणजे तुम्ही उद्योजक झालात, हे एवढं सोप्प नसतं. त्या व्यवसायाची वाढ करणं, त्याला टिकवणं याची जबाबदारी तुमच्यावरच असते. आर्थिक साक्षरता तुम्हाला नफ्याची पुनर्गुंतवणूक कशी करावी, कोणते बाजार विभाग फायदेशीर आहेत हे ओळखणं. तसेच, व्यवसायाची वाढ करताना कोणत्या चुका टाळायच्या हे समजण्यासही तुम्हाला मदत मिळते. तसेच, या  ज्ञानामुळे तुम्हाला शाश्वत वाढीसह दीर्घकालीन यशाचा पाया रोवता येतो..

वैयक्तिक आर्थिक स्थिरता मिळेल

उद्योजक सुरुवातीच्या टप्प्यावर अनेकदा वैयक्तिक आणि व्यवसायाशी संबंधित व्यवहार एकत्रच ठेवतात. यामुळे थोडा गोंधळ होऊ शकतो. कारण, किती खर्च होत आहे, हे समजायला अवघड जाऊ शकतो. अशा वेळी आर्थिक साक्षरता तुमचं वैयक्तिक आर्थिक आरोग्य अबाधित ठेवण्यास मदत करते. ती तुम्हाला संपत्ती निर्माण करायला, आर्थिक स्वातंत्र्य मिळवायला आणि स्वतःच्या व्यवसायातही यशस्वी गुंतवणूक करायला सक्षम करते.

कामाची गोष्ट


आर्थिक साक्षरता ही यशस्वी उद्योजकतेची मजबूत पायरी आहे. हे तर तुमच्या लक्षात आलंच असेल. कारण, आर्थिक साक्षरतेमुळे तुम्हाला आर्थिक निर्णय नीट घेण्याचं सामर्थ्य मिळतं, गुंतवणूक मिळवण्यास मदत होते, धोके ओळखता येतात, व्यवसाय योग्य वेळी वाढवता येतो आणि तुमचं स्वतःचं आर्थिक भविष्यही सुरक्षित राहतं.

माझा स्वतःचा अनुभव सांगतो की, आर्थिक साक्षरतेमुळे माझं उद्योजकीय जीवन अधिक सजग आणि स्थिर झालं. त्यामुळे प्रत्येक नवोदित उद्योजकाने आपल्या आर्थिक शिक्षणाला प्राधान्य द्यायलाच हवं. कारण पैसा समजून घेणं म्हणजे स्वतःचं भविष्य समजून घेणं होय. 


Share On: