Financial Inclusion: आर्थिक समावेशन का महत्त्वाचे आहे? चला सविस्तर समजून घेऊया..

Blog-img

Financial Inclusion: आर्थिक समावेशन का महत्त्वाचे आहे? चला सविस्तर समजून घेऊया..

भारत सध्या मोठ्या आर्थिक परिवर्तनाच्या टप्प्यातून जात आहे. डिजिटल पेमेंट्स, ऑनलाइन कर्ज सुविधा आणि सुलभ बँकिंग सेवांमुळे लोक पैसे व्यवस्थापित करण्याची पद्धत बदलत आहे. या बदलाच्या केंद्रस्थानी एक महत्त्वाची संकल्पना आहे, आर्थिक समावेशन (Financial Inclusion). हा शब्द जरी तांत्रिक वाटत असला, तरी त्याचा परिणाम अत्यंत प्रत्यक्ष आणि महत्त्वाचा आहे, विशेषतः तरुण, गिग वर्कर्स आणि पहिल्या पिढीतील उद्योजकांसाठी, जे भारताच्या प्रगतीला गती देत आहेत.. 

आर्थिक समावेशन म्हणजे काय? 

आर्थिक समावेशन म्हणजे प्रत्येक व्यक्ती आणि व्यवसायाला उपयुक्त आणि परवडणाऱ्या आर्थिक सेवांचा प्रवेश मिळणे होय. मग यामध्ये बचत खाते, कर्ज, विमा, डिजिटल पेमेंट्स आणि गुंतवणुकीच्या संधींचा समावेश होतो. थोडक्यात, हे समान संधी, आर्थिक स्थैर्य आणि सुरक्षित भविष्य घडवण्याची क्षमता आर्थिक समावेशनातून समजते.. 

अधिक समावेशक भारत : आज याचे महत्त्व का? 

आर्थिक समावेशन हा केवळ सरकारचा उद्देश नाही, तर तरुण आणि महत्त्वाकांक्षी देशासाठी गरज आहे. शिवाय, आर्थिक सेवांपर्यंत पोहोच असणे हे एखाद्या व्यक्तीला फक्त जगण्यासाठी नव्हे, तर प्रगती करण्यासाठी संधी देते.  

आजही भारतातील अनेक लोक बचत किंवा कर्जासाठी अनौपचारिक स्रोतांवर अवलंबून असतात. यामुळे जास्त व्याजदर, कमी पारदर्शकता आणि आर्थिक असुरक्षितता निर्माण होऊ शकते. परंतु, जेव्हा लोक औपचारिक आर्थिक व्यवस्थेत येतात, तेव्हा त्यांना पैसे सुरक्षितपणे व्यवस्थापित करण्याची, भविष्यासाठी नियोजन करण्याची आणि योग्य निर्णय घेण्याची साधने मिळतात. 

उदाहरणार्थ: 

लघू उद्योजकाला मायक्रोक्रेडिट मिळाल्यास तो आवश्यक उपकरणांमध्ये गुंतवणूक करू शकतो. 

गिग वर्करकडे बँक खाते आणि UPI सुविधा असल्यास त्याला त्वरित आणि सुरक्षित पेमेंट मिळू शकते. 

लहान शहरातील विद्यार्थ्यांना लवकर क्रेडिट हिस्ट्री तयार करता येते, ज्यामुळे त्यांना पुढे कर्ज मिळवणे सोपे होते. 

आजघडीला भारत अधिकाधिक डिजिटल होत असताना, आर्थिक समावेशन ही फक्त लक्झरी नसून नवनवीनन संधी निर्माण करणारा पाया ठरत आहे. 
 

वैयक्तिक आणि व्यवसायिक आर्थिक नियोजन म्हणजे काय? 

अनेक तरुण उद्योजक आणि फ्रीलान्सर नकळतपणे वैयक्तिक आणि व्यवसायिक आर्थिक व्यवहार एकत्र करतात. परंतु, दीर्घकालीन दृष्टीने हे नुकसानकारक ठरू शकते. त्यामुळे तेव्हाच आर्थिक समावेशन अधिक प्रभावी ठरते, जेव्हा आपण या दोन्ही प्रकारांमधील फरक समजून घेऊ. 

1. वैयक्तिक आर्थिक नियोजन

वैयक्तिक आर्थिक नियोजन म्हणजे स्वतःच्या पैशांचे योग्य व्यवस्थापन. यात पुढील गोष्टींचा समावेश होतो: 

बचत करणं 

इमर्जन्सी फंड तयार ठेवणं 

विमा असणं 

कर्जाचे योग्य व्यवस्थापन करणं 

शिक्षण किंवा निवृत्ती यांसारख्या दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी गुंतवणूक करणं 
 

नवीन करिअर सुरू करणाऱ्या किंवा पहिला व्यवसाय सुरू करणाऱ्या तरुणांसाठी मजबूत वैयक्तिक आर्थिक नियोजन आत्मविश्वास आणि स्थैर्य निर्माण करते. कारण, अचानक येणाऱ्या खर्चामुळे जीवन किंवा व्यवसायावर परिणाम होऊ नये, यासाठी हे आवश्यक आहे. 
 

2. व्यवसायिक आर्थिक नियोजन

व्यवसायिक आर्थिक नियोजन म्हणजे व्यवसायाच्या आर्थिक व्यवस्थापनाशी संबंधित नियोजन. यात पुढील गोष्टी महत्त्वाच्या असतात: 

कॅशफ्लोवर लक्ष ठेवणं 

कार्यभांडवल मॅनेज करणं 

उत्पन्न आणि खर्चाची स्पष्ट नोंद ठेवणं 

व्यवसाय विस्ताराचे नियोजन करणं 

कर नियमांचे पालन करणं 

व्यवसायासाठी स्वतंत्र क्रेडिट प्रोफाईल तयार करणं 

भारतातील स्टार्टअप्स आणि लघू उद्योगांसाठी, आर्थिक समावेशन हे MSME कर्जे, डिजिटल पेमेंट सोल्यूशन्स, सरकारी योजना आणि डिजिटल रेकॉर्ड-कीपिंगचे मार्ग मोकळे करते. जेव्हा वैयक्तिक आणि व्यावसायिक आर्थिक नियोजन एकमेकांपासून वेगळे ठेवले जातात, तेव्हा व्यवसाय अधिक स्थिर, अधिक विश्वासार्ह आणि गुंतवणुकीसाठी योग्य बनतो. 
 

3. भारतात हा फरक का महत्त्वाचा आहे?

पहिल्या पिढीतील उद्योजक बहुतेक त्यांच्या वैयक्तिक पैशातून व्यवसायाचा आरंभ करतात. परंतु, सर्व खाते एकत्रच असल्याने नफा मोजणे, कर्ज मिळवणे किंवा व्यवसाय वाढवणे कठीण होते. पण, आर्थिक समावेशन यासाठी प्रोत्साहन देते: 

स्वतंत्र व्यवसाय खाते उघडणं 

डिजिटल व्यवहारांची नोंद ठेवणं 

विश्वसनीय क्रेडिट हिस्ट्री तयार करणं 

पारदर्शक आर्थिक व्यवस्थापन करणं 

भारताच्या वेगाने वाढणाऱ्या स्टार्टअप इकोसिस्टममध्ये ही स्पष्टता अत्यंत आवश्यक आहे.  कारण, यामुळे गुंतवणुकदार,  कर्जदाते यांचा विश्वास वाढतो. तसेच, व्यावसायिकता आणि आर्थिक शिस्त लागायलाही मदत होते.. 
 

उद्योजकतेसाठी आर्थिक समावेशन कसे मदत करते? 

आज भारतात उद्योजकतेसाठी पूर्वीपेक्षा अधिक संधी उपलब्ध आहेत. तरीही भांडवल मिळवणे हे मोठे आव्हान आहे. पण, आर्थिक समावेशन या समस्येवर उपाय देते. 
 

1. कर्ज मिळण्याची व्यवस्था

डिजिटल क्रेडिट मूल्यांकन, सोपी कागदपत्र प्रक्रिया आणि मुद्रा कर्जांसारख्या सरकारी पाठबळ असलेल्या योजनांमुळे उद्योजकांना महागड्या अनौपचारिक कर्जदात्यांवर अवलंबून न राहता फंड मिळवता येतो. यामुळे आर्थिक धोका कमी होतो आणि अधिक लोकांना उद्योजकतेचा मार्ग निवडण्याचे बळ मिळते. 

2. पारदर्शक डिजिटल पेमेंट

UPI मुळे छोट्या व्यवसायांचे व्यवहार अधिक सोपे आणि पारदर्शक झाले आहेत. त्वरित पेमेंट, स्पष्ट नोंदी आणि व्यापक ग्राहक वर्गामुळे गुंतवणुकदार व बॅंकाच्या नजरेत व्यवसाय अधिक विश्वासार्ह बनायला मदत होत आहे. 

3. जोखीम संरक्षण

आर्थिक समावेशनामुळे परवडणाऱ्या विमा सुविधा उपलब्ध होतात. त्यामुळे अनपेक्षित संकटांपासून व्यक्ती आणि व्यवसाय दोघांचेही संरक्षण होण्यास मदत होते. 

4. मजबूत क्रेडिट इतिहास

नियमित बँक व्यवहार, वेळेवर कर्जफेड आणि डिजिटल पेमेंट्स यामुळे मजबूत आर्थिक ओळख तयार होते. यामुळे पुढे कर्ज किंवा क्रेडिट कार्ड मिळवणे सोपे होते. 

आर्थिक समावेशनामुळे मजबूत अर्थव्यवस्था 

  

ज्या समाजात आर्थिक समावेशन असते, तिथे लोक अधिक बचत करतात, योग्य गुंतवणूक करतात आणि अर्थव्यवस्थेत सक्रिय सहभाग घेतात. यामुळे पुढील फायदे होतात: 

  

उत्पादनक्षमता वाढते 

रोख व्यवहारांवर अवलंबित्व कमी होते 

मजबूत क्रेडिट संस्कृती तयार होते 

ग्रामीण आणि निमशहरी भागातून अधिक सहभाग वाढतो 
 

भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात, आर्थिक समावेशनामुळे आर्थिक वाढ सर्वसमावेशक बनते. हे व्यक्तींना आर्थिक सुरक्षितता निर्माण करण्यास मदत करते, व्यवसायांना नवकल्पनांसाठी सक्षम बनवते आणि एकूण अर्थव्यवस्थेला अधिक बळकट करते.  
 

भारताच्या उद्योजकांसाठी नवी दिशा 

आजच्या तरुणांसाठी, गिग वर्कर्ससाठी आणि स्टार्टअप संस्थापकांसाठी आर्थिक समावेशन ही केवळ संकल्पना नाही, तर प्रगतीचे प्रभावी साधन आहे. हे व्यक्तींना योग्य आर्थिक निर्णय घेण्यास मदत करते, व्यवसायांना आवश्यक संसाधने उपलब्ध करून देते.. तसेच, करिअर व समाज दोन्ही घडवण्याच्या संधी निर्माण करते. 

भारत अधिकाधिक डिजिटल आणि औपचारिक अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत असताना, वैयक्तिक आणि व्यवसायिक आर्थिक नियोजनातील फरक समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. मुळात आर्थिक समावेशन म्हणजे प्रत्येक भारतीयाला आर्थिक प्रगतीमध्ये सहभागी होण्याची समान संधी देणे आणि उद्योजकांच्या पुढील पिढीसाठी ही संधी त्यांच्या भविष्याची दिशा बदलू शकते.

 

 


Share On: