व्यवसायात माझ्याकडून झालेल्या चुका, तुम्ही करू नका..!

Blog-img

व्यवसायात माझ्याकडून झालेल्या चुका, तुम्ही करू नका..!

Helpful Tips For Starting Business : व्यवसायाचा आरंभ म्हणजे उत्साह व आव्हानांचा सुंदर प्रवास होय.. उद्योजक म्हणून जेव्हा तुमचा प्रवास सुरू होतो. तेव्हा तुम्हाला अनेक संकटं, विरोध आणि संघर्षांना तोंड देत पुढे जात राहावं लागतं. यातूनच तुमच्या सोबतीला अनुभव नावाची गोष्ट समृद्ध होत असते. 

जेव्हा मी माझ्या उद्योजकतेच्या प्रवासाचा विचार करतो, तेव्हा काही महत्वाच्या चुका प्रकर्षाने माझ्या डोळ्यासमोर उभ्या राहतात. या चुका तुमच्या हातून घडू नये, म्हणून माझा अनुभव मी तुमच्यासोबत या ब्लाॅगच्या माध्यमातून शेअर करत आहे. यातील माझे अनुभव तुमचा उद्योजक होण्याचा प्रवास नक्कीच सोपा करतील.. 

मार्केट रिसर्च आवश्यक आहे..

कोणताही व्यवसाय सुरू करण्याआधी मार्केट रिसर्च करणं आवश्यक असते. पण, मी व्यवसाय सुरू करताना, रिसर्च केला नाही. ही माझी मोठी चूक होती, असं मला आजही जाणवतं. कारण, या गोष्टीला मी खूपच कमी महत्व दिलं. यामुळे मला माझा ग्राहक, त्यांच्या गरजा आणि स्पर्धक ओळखायला अवघड गेलं. 

म्हणून मी माझं प्राॅडक्ट योग्य ग्राहकांपर्यंत पोहचवू शकलो नाही. यासाठी मला प्रचंड संघर्ष करावा लागला. त्यामुळे व्यवसाय सुरू करण्याआधी मार्केट रिसर्च, ग्राहक आणि  स्पर्धकांचं मूल्यांकन करण्यासाठी वेळ काढा.  ही माहिती तुमच्या व्यवसायाचे धोरण ठरवण्यासाठी नक्कीच कामी येईल.

प्लॅनिंग मजबूत हवी..!

माझ्या आयडियाला सत्यात उतरवण्याच्या उत्सुकतेत, मी प्लॅनिंगच्या महत्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले. तसे, पाहायला गेल्यास व्यापक व्यवसाय प्लॅन बनवून, मी माझे ध्येय, लागणारा पैसा आणि मार्केटिंग धोरण यांचा आराखडा बांधू शकलो असतो. मात्र, माझ्याकडे प्लॅन नसल्यामुळे मला निर्णय घ्यायला, खूप कठीण गेलं.

म्हणून व्यवसायात उतरण्याआधीच तुमच्याकडे व्यवसायाचा पूर्ण प्लॅन असला पाहिजे, जो तुम्हाला विना अडथळा पुढे जायला मदत करेल. तसेच, कोणतीही अडचण आली तरी हा प्लॅनच तुम्हाला त्यातून मार्ग काढून देईल. कारण, कुठे काय होऊ शकते, हे तुम्हाला आधीच माहिती असेल.

फायनान्शियल मॅनेजमेंट चोख हवं

व्यवसाय नव्याने सुरू करायचा म्हटल्यावर, पैसा लागतोच. म्हणूनच व्यवसायात फायनान्शियल मॅनेजमेंट महत्वाचे असते. पण, नेमकं तेच करायचं, मी विसरून गेलो. यामुळे मी खर्चांचा हिशोब ठेवू शकलो नाही, बजेट तयार करण्याकडे दुर्लक्ष केलं आणि अनपेक्षित खर्चांना थोपवण्यात अपयशी ठरलो. मी हे सगळं प्लॅनिंग आणि काटेकोर लक्ष ठेवून, टाळू शकलो असतो. मात्र, माझ्या चुकीमुळे मला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. 

म्हणूनच व्यवसायात उतरायच्या आधीच सर्व हिशोब राखायची सिस्टिम तुमच्याजवळ असू द्या. याचबरोबर वेळोवेळी तुमच्या आर्थिक स्टेटमेंटचा रिव्ह्यू करत राहा. तसेच, गरज वाटल्यास एखाद्या प्रोफेशनल व्यक्तीचा सल्लाही तुम्ही घेऊ शकता. यामुळे तुम्ही व्यवसायात येणार्‍या आर्थिक अडचणींवर सहज मात करू शकता.

लढायी एकटे लढू नका..

उद्योजक होणं हा एकट्याचा प्रवास असू शकतो, यात दुमत नाही. मात्र, याचा अर्थ असा नाही, की सर्व काही एकट्यानेच करायचे आहे. हीच घोडचूक माझ्याकडून झाली, व्यवसायातील प्रत्येक गोष्ट मी स्वत: हाताळण्याचा प्रयत्न केला. यामुळे मला प्रचंड थकवा जाणवू लागला, माझ्या कामावरही याचा फरक पडल्याने गुणवत्ता ढासळू लागली. 

म्हणून शक्यतो अशा नेटवर्कमध्ये राहा, ज्यांना व्यवसाय क्षेत्राचा अनुभव आहे. तसेच, तुम्हाला ज्या गोष्टी येत नाही, त्यात त्यांनी महारथ प्राप्त केली आहे. जे लगेच तुमच्या मदतीला धावून येतील आणि मार्गदर्शन करतील. यामुळे तुमचा बराच वेळ वाचेल. तुम्हाला महत्वाच्या कामावर ताकदीने फोकस करता येईल..

मार्केटिंग करेल तुमचं काम सोपं..

मी जेव्हा नव्याने व्यवसाय सुरू केला, तेव्हा मला विश्वास होता की, मार्केटिंग व ब्रॅंडिंग न करताच ग्राहकांना माझा व्यवसाय माहिती होईल. मात्र, हे खोटं ठरलं. मला समजलं की, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी, आपल्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा उठून दिसण्यासाठी आपली वेगळी ओळख असणं आवश्यक आहे. ही ओळख मिळवायची असल्यास  मार्केटिंग व ब्रॅंडिंग करावीच लागणार. तेव्हाच आपण ग्राहकांपर्यंत पोहचू शकू.

म्हणून आधीच ब्रॅंडिंग व मार्केटिंगचा प्लॅन तयार करून, तुमचा व्यवसाय ग्राहकांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रभावीपणे प्रमोट करा. तसेच, हे करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचा व्यवसाय लगेच ग्राहकांपर्यंत पोहचणार नाही. कारण, ब्रॅंडविषयी जागरूकता निर्माण करणं, मेहनतीचं व वेळखाऊ काम आहे. त्यामुळे हे काम जितक्या लवकर सुरू करता येईल, तेवढं चांगलं. तसेच,  मार्केटिंगच्या कामातही खंड पडायला नको, म्हणून प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवा. 

कामाची गोष्ट

व्यवसायाचा आरंभ म्हणजे कधीच न संपणारा आणि खूप काही शिकवणारा प्रवास आहे. या प्रवासात होणाऱ्या चुकांमधून शिकतच आपल्याला पुढे जायचे आहे. मला हेच अपेक्षित आहे की, माझ्याकडून ज्या चुका झाल्या, त्या नवीन उद्योजकांकडून होऊ नये. त्यांच्या मार्गात कोणताच अडथळा येऊ नये. 

तसेच, त्यांना माझ्या प्रवासातून प्रेरणा मिळावी, यासाठी मी माझ्या चुका शेअर करत आहे. म्हणून व्यवसाय सुरू करताना मार्केट रिसर्च, मजबूत प्लॅनिंग,  फायनान्शियल मॅनेजमेंट, कामाची मांडणी आणि मार्केटिंग व ब्रॅंडिंगचा प्लॅन करायला विसरू नका. तसेच, यांचा योग्य वापर करून व्यवसाय यशस्वीपणे पुढे न्या.. तुमच्या नव्या इनिंगसाठी शुभेच्छा..


Share On: