Customer Retention: नवीन ग्राहक मिळवण्यापेक्षा जुने ग्राहक टिकवणं का महत्त्वाचं? चला सविस्तर जाणून घेऊया..
आज कोणतेही क्षेत्र घ्या प्रचंड स्पर्धा आहे, अशा वातावरणात व्यवसायासाठी नवीन ग्राहक मिळवणं महत्त्वाचं आहे. पण त्याहून महत्त्वाचं आहे असलेले ग्राहक टिकवून ठेवणं. अनेक स्टार्टअप्स आणि वाढणारे व्यवसाय नवीन ग्राहक मिळवण्यासाठी जाहिराती, ऑफर्स आणि मार्केटिंगवर मोठा खर्च करतात. मात्र, जुन्या ग्राहकांना आपल्या व्यवसायाशी जोडून ठेवण्याकडे अनेकदा दुर्लक्ष करतात. नवीन ग्राहक मिळाल्याने व्यवसायाची सुरुवातीला चांगली वाढ होऊ शकते. पण व्यवसाय दीर्घकाळ यशस्वी आणि फायदेशीर ठेवायचा असेल, तर ग्राहक टिकवून ठेवणं गरजेचं आहे.
उद्योजक आणि स्टार्टअप्ससाठी Customer Retention म्हणजे ग्राहक टिकवून ठेवणं, ही फक्त मार्केटिंगची पद्धत नाही. हा व्यवसायाच्या चांगल्या आणि स्थिर वाढीचा महत्त्वाचा भाग आहे. समाधानी आणि विश्वासू ग्राहक व्यवसायाला स्थिरता देतात, नफा वाढवतात आणि ब्रँडवरील विश्वासही मजबूत करतात.. म्हणून आज ग्राहक कसे टिकवून ठेवायचे, यावर आपण सर्व फोकस करणार आहोत..
जुन्या ग्राहकांना टिकवणं महत्वाचं
नवीन व्यवसाय सुरू केल्यावर आपली सेवा किंवा प्राॅडक्ट ग्राहकांनी घेतल्यावर वेगळाच उत्साह वाटतो. कारण, नवीन ग्राहकांमुळे व्यवसायाची ओळख वाढते, विक्रीला चालना मिळते आणि व्यवसायाच्या वाढीला नवी गती मिळते. मात्र, नवीन ग्राहक मिळवण्यासाठी व्यवसायाला मोठा खर्चही करावा लागतो. जाहिराती, सूट, सोशल मीडिया कॅम्पेन आणि ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी केले जाणारे विविध प्रयत्न यासाठी मोठ्या प्रमाणात वेळ आणि पैसा खर्च होतो.
याउलट, जुने ग्राहक आधीपासूनच आपल्या व्यवसायावर विश्वास ठेवतात आणि आपल्या प्राॅडक्ट किंवा सेवांशी परिचित असतात. त्यामुळे ते पुन्हा खरेदी करण्याची शक्यता अधिक असते. म्हणूनच, सतत नवीन ग्राहक शोधण्यापेक्षा असलेल्या ग्राहकांशी चांगले संबंध टिकवून त्यांचा विश्वास कायम ठेवणं अधिक किफायतशीर आणि व्यवसायाच्या दीर्घकालीन वाढीसाठी फायदेशीर ठरतं.
निष्ठावंत ग्राहकांमुळे व्यवसायाची होते वाढ..
निष्ठावंत ग्राहक केवळ थेट खरेदी करूनच नाही, तर इतर अनेक मार्गांनीही व्यवसायाच्या वाढीत मोलाचे योगदान देतात. समाधानी असणारा ग्राहक अनेकदा त्यांचे मित्र, कुटुंबिय आणि सोशल मीडियावरील ओळखीच्या लोकांना संबंधित व्यवसायाची शिफारस करतात. या शिफारसी खूप कामाच्या असतात. कारण, लोक जाहिरातींपेक्षा वैयक्तिक अनुभवांवर जास्त विश्वास ठेवतात. बऱ्याच प्रकरणांमध्ये, हे निष्ठावंत ग्राहक बिनपगारी 'ब्रँड ॲम्बेसेडर' बनतात, जे व्यवसायाला पुढे नेण्यास मदत करतात. यासाठी आपल्याला फक्त सर्वोत्तम सेवा देणं गरजेचं असतं..
ग्राहकांच्या वेळेची किंमत करणं गरजेचं
ग्राहक एखाद्या व्यवसायाला दीर्घकाळ धरून राहण्यामागचं सर्वांत महत्त्वाचं कारण म्हणजे विश्वास. हा विश्वास एका दिवसात निर्माण होत नाही. सातत्याने चांगला अनुभव देणं, विश्वासार्ह सेवा देणं आणि ग्राहकांशी प्रामाणिकपणे संवाद साधणं यातून तो हळूहळू तयार होतो. ग्राहकांना आपल्या शब्दांवर ठाम राहणारे आणि त्यांच्या वेळेची किंमत जाणणारे व्यवसाय अधिक जवळचे वाटतात. तसेच, एखादा चांगला अनुभव ग्राहकाला सुरुवातीला आकर्षित करू शकतो, पण सतत मिळणारे सकारात्मक अनुभवच दीर्घकालीन निष्ठा निर्माण करतात. त्यामुळे ग्राहकांचा विश्वास जपणं हीच दीर्घकाळ टिकणाऱ्या नात्याची खरी सुरुवात आहे.
ग्राहकसेवेला प्रथम प्राधान्य
बहुतेक जण नवीनच व्यवसायात उतरल्यावर ग्राहकसेवेला अधिक महत्व देत नाहीत. ग्राहकांच्या प्रश्नांना वेळेत उत्तर देणं, त्यांच्या अडचणी तत्परतेने सोडवणं आणि त्यांच्याशी आदराने संवाद साधणं यामुळे ग्राहकांच्या मनात व्यवसायाविषयी चांगली आणि कायमस्वरूपी प्रतिमा निर्माण होते. ग्राहकांशी संवाद साधताना दाखवलेली छोटीशी व्यावसायिकता आणि आपुलकीची भावनादेखील नातं अधिक मजबूत करू शकते. जेव्हा ग्राहकांना आपला आदर केला जात आहे आणि आपलं म्हणणं समजून घेतलं जातं, असं जाणवतं. तेव्हा ते त्या व्यवसायाशी दीर्घकाळासाठी जोडले जाऊन, व्यवसायाला पाठींबाही देतात.
ग्राहकांना गरजेनुसार सेवा देणं
ग्राहकांना दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी वैयक्तिक गरजांनुसार सेवा देणं ही एक प्रभावी पद्धत आहे. आजचे ग्राहक त्यांच्या आवडी, गरजा आणि अपेक्षा समजून घेणाऱ्या व्यवसायांना अधिक पसंती देतात. त्यांच्या गरजेनुसार उत्पादन किंवा सेवेच्या शिफारसी करणं, वेळोवेळी योग्य फॉलो-अप घेणं किंवा त्यांच्यासाठी खास ऑफर देणं, यामुळे ग्राहकांना आपण केवळ एक ग्राहक नसून महत्त्वाची व्यक्ती आहोत, असं जाणवतं. ग्राहकांशी साधलेला छोटासा वैयक्तिक संवादही त्यांच्याशी अधिक आपुलकीचं आणि विश्वासाचं नातं निर्माण करू शकतो. ग्राहकांच्या गरजा समजून घेऊन त्यांच्याकडे वैयक्तिक लक्ष दिलं, तर ते व्यवसायाशी अधिक घट्टपणे जोडले जातात.
सेवेतलं सातत्य आहे आवश्यक
ग्राहकांचा विश्वास आणि नातं टिकवून ठेवण्यासाठी सातत्यपूर्ण सेवा देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. अनेक व्यवसाय पहिल्यांदा ग्राहकाला चांगला अनुभव देण्यासाठी खूप प्रयत्न करतात; मात्र त्यानंतर त्याच दर्जाची सेवा कायम ठेवण्यात कमी पडतात. ग्राहकांना उत्पादनाची गुणवत्ता, संवाद, सेवा, डिलिव्हरी आणि ग्राहक सहाय्य या सर्वच बाबतीत सातत्याची अपेक्षा असते. वारंवार त्यांच्या अपेक्षा पूर्ण होत नसतील, तर ग्राहक हळूहळू दुसरे पर्याय शोधू लागतात. म्हणूनच, सेवेतलं सातत्य विश्वास निर्माण करतं आणि हाच विश्वास ग्राहकांना व्यवसायाशी दीर्घकाळ जोडून ठेवतो.
ग्राहकांच्या संपर्कात राहणं फायद्याचं
ग्राहकांना दीर्घकाळ जोडून ठेवण्यासाठी त्यांच्याशी सातत्याने संपर्कात राहून संवाद कायम ठेवणं हा आणखी महत्त्वाचा घटक आहे. ग्राहकांशी नियमितपणे संपर्कात राहणारे व्यवसाय ग्राहकांच्या लक्षात राहतात आणि त्यांच्या गरजांशी अधिक चांगल्या प्रकारे जोडलेले राहतात. यासाठी न्यूजलेटर, उपयुक्त आणि माहितीपूर्ण कंटेंट, लॉयल्टी प्रोग्राम, सोशल मीडिया अपडेट्स किंवा ग्राहकांसाठी तयार केलेले कम्युनिटी ग्रुप्स यासारख्या माध्यमांचा वापर करता येतो. मात्र, यामागचा उद्देश सतत उत्पादनांची किंवा सेवांची जाहिरात करणं नसून, ग्राहकांशी विश्वासाचं आणि अर्थपूर्ण नातं दीर्घकाळ टिकवून ठेवणं हा असायला हवा.
ग्राहकांचं ऐका, विश्वास वाढत जाईल..
विशेषतः स्टार्टअप्ससाठी ग्राहकांशी भावनिक नातं निर्माण करणं अधिक महत्त्वाचं ठरतं. एखाद्या ब्रँडशी ग्राहकांचं भावनिक नातं जोडलेलं असेल, तर त्यांच्यासमोर स्वस्त पर्याय उपलब्ध असतानाही ते सहजपणे दुसऱ्या ब्रँडकडे वळत नाहीत. केवळ किंमत किंवा सवलतीवर आधारित नात्यापेक्षा विश्वास आणि भावनिकतेने जोडलेली ग्राहकनिष्ठा अधिक मजबूत आणि दीर्घकाळ टिकणारी असते. यासोबतच, ग्राहकांचं म्हणणं ऐकून घेणं हेही ग्राहकांना दीर्घकाळ जोडून ठेवण्यासाठी तितकंच महत्त्वाचं आहे.
यशस्वी व्यवसाय ग्राहकांच्या प्रतिक्रिया, तक्रारी आणि सूचनांकडे गांभीर्याने पाहतात आणि त्यानुसार आपल्या सेवा सातत्याने सुधारत राहतात. ग्राहकांकडून मिळणारा अभिप्राय व्यवसायातील उणिवा ओळखण्यास, ग्राहकांचा अनुभव अधिक चांगला करण्यास आणि बदलत्या अपेक्षांनुसार स्वतःमध्ये आवश्यक बदल करण्यास मदत करतो. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, ग्राहकांचं म्हणणं ऐकून न घेता, त्यांच्या सूचनांवर प्रत्यक्ष कृती केली जाते, हे जाणवलं की ग्राहकांचा व्यवसायावरील विश्वास आणखी वाढतो.
ग्राहकांसोबत विश्वासाचं नातं करा तयार
व्यवसाय करताना अनेकदा विक्री वाढवण्यावरच अधिक भर दिला जातो. त्यामुळे ग्राहकांसोबत विश्वासाचं नात तयार होऊ शकत नाही. व्यवसाय मोठा करताना विक्री आणि उत्पन्न वाढणं महत्त्वाचं असलं, तरी व्यवसायाचं दीर्घकालीन यश हे ग्राहकांचं समाधान आणि त्यांचा विश्वास टिकवून ठेवण्यावर अवलंबून असतं. वारंवार ग्राहक गमावणाऱ्या व्यवसायांना नवीन ग्राहक मिळवण्यासाठी पुन्हा पुन्हा अधिक पैसा खर्च करावा लागतो. त्यामुळे अनावश्यक आर्थिक भार वाढतो आणि व्यवसायाच्या स्थिरतेवरही परिणाम होतो. मर्यादित बजेटमध्ये काम करणाऱ्या स्टार्टअप्ससाठी ही अडचण आणखी मोठी ठरू शकते.
व्यवसाय वाढीचे नियोजन शक्य
ग्राहकांना दीर्घकाळ जोडून ठेवण्याचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे उत्पन्नात सातत्य निर्माण होतं. व्यवसायाशी समाधानी असलेले जुने ग्राहक पुन्हा खरेदी करण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे नियमित उत्पन्न मिळत राहतं आणि भविष्यातील व्यवसायवाढीचं नियोजन अधिक आत्मविश्वासाने करता येतं. उत्पन्नाचा अंदाज अधिक स्पष्ट असल्यामुळे व्यवसायाचा विस्तार, नवीन प्रयोग, प्राॅडक्ट किंवा सेवांमध्ये सुधारणा आणि ग्राहकांचा अनुभव अधिक चांगला करण्यासाठी योग्य पद्धतीने गुंतवणूक करता येते. त्यामुळे ग्राहक टिकवणं हे केवळ विक्रीचा खर्च कमी करण्यापुरतं मर्यादित नसून, व्यवसायाला स्थिर आणि दीर्घकाळ टिकणारी वाढ देण्यासाठीही महत्त्वाचं ठरतं.
अडचणीच्या काळात निष्ठावान ग्राहक घेतात समजून
निष्ठावान ग्राहक एखाद्या व्यवसायासमोर अडचणीची परिस्थिती निर्माण झाली तरी समजून घेऊन सहकार्य करण्याची शक्यता असते. प्रत्येक व्यवसायाला डिलिव्हरीला विलंब, तांत्रिक अडचणी किंवा सेवा खंडित होण्यासारख्या समस्यांना सामोरं जावं लागतं. मात्र, व्यवसायावर आधीपासून विश्वास असलेले ग्राहक अशा प्रसंगी संयम ठेवून परिस्थिती समजून घेण्याची शक्यता अधिक असते. याउलट, व्यवसायाशी अद्याप नातं निर्माण न झालेल्या नव्या ग्राहकांकडून अशी समजूत आणि सहकार्य मिळेलच असं नाही.
ग्राहकाची चांगली प्रतिक्रिया व्यवसायाला करणार बुस्ट
आजच्या डिजिटल युगात ग्राहक आपला अनुभव फार वेगाने इतरांपर्यंत पोहोचवतो. ऑनलाइन प्रतिक्रिया आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एखाद्या ग्राहकाचा सकारात्मक अनुभव ब्रँडची प्रतिमा अधिक मजबूत करू शकतो, तर नकारात्मक अनुभवामुळे प्रतिष्ठेला अल्पावधीत मोठा धक्का बसू शकतो. म्हणूनच, आजच्या स्पर्धात्मक वातावरणात ग्राहकांना जोडून ठेवणं पूर्वीपेक्षा अधिक महत्त्वाचं झालं आहे. सातत्याने चांगली सेवा, योग्य मूल्य आणि सकारात्मक अनुभव देणारे व्यवसाय ग्राहकांचा विश्वास जिंकण्यासोबतच बाजारात आपली मजबूत आणि विश्वासार्ह ओळख निर्माण करण्यात अधिक यशस्वी ठरतात.
ग्राहकांना चांगला अनुभवच निष्ठावान करतो..
ग्राहकांना दीर्घकाळ जोडून ठेवण्यासाठी फक्त सवलती किंवा ऑफर्स पुरेशा नसतात, हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. सवलती, रिवॉर्ड्स आणि विशेष ऑफर्समुळे ग्राहक पुन्हा खरेदी करण्यास प्रवृत्त होऊ शकतात; मात्र खरी ग्राहकनिष्ठा विश्वास, मिळणारं मूल्य, विश्वासार्ह सेवा आणि सातत्याने मिळणाऱ्या चांगल्या अनुभवातून निर्माण होते. ग्राहकांच्या अडचणी प्रभावीपणे सोडवणारे, त्यांच्या वेळेची कदर करणारे आणि त्यांना महत्त्व दिलं जातं, अशी भावना निर्माण करणाऱ्या ब्रँडशी ग्राहक अधिक काळ जोडलेले राहतात.
ग्राहक टिकवण्याकडे दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून पाहावे..
विशेषतः तरुण उद्योजक आणि स्टार्टअप संस्थापकांनी ग्राहक टिकवून ठेवण्याकडे अल्पकालीन उपाय म्हणून नव्हे, तर दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून पाहणं गरजेचं आहे. ग्राहकांशी मजबूत नातं निर्माण करण्यासाठी वेळ, प्रयत्न आणि सातत्य आवश्यक असतं. मात्र, त्यातून मिळणारे फायदे सतत नवीन ग्राहक शोधण्याच्या प्रयत्नांपेक्षा अधिक मोठे असतात. ग्राहकांना जोडून ठेवण्यावर सातत्याने भर देणाऱ्या व्यवसायाची पायाभरणी अधिक मजबूत होते, नफ्याची क्षमता वाढते आणि बाजारातील आव्हानात्मक परिस्थितीतही व्यवसाय अधिक सक्षमपणे टिकून राहू शकतो.
कामाची गोष्ट
शेवटी, यशस्वी व्यवसाय नवीन ग्राहकांना आकर्षित करून उभा राहत नाही, तर ग्राहकांनी पुन्हा पुन्हा आपल्याकडे यावं, असा विश्वास त्यांच्या मनात निर्माण करणं गरजेचा असतो. तसेच, ग्राहकांना दीर्घकाळ जोडून ठेवण्यामुळे व्यवसायाची विश्वासार्हता वाढते, नफ्यात वाढ होते, आर्थिक स्थैर्य निर्माण होतं आणि दीर्घकालीन वाढीसाठी मजबूत आधार मिळतो. कारण, व्यवसायासाठी सर्वांत मौल्यवान ग्राहक नेहमीच नवीन ग्राहक असेल असं नाही. दीर्घकाळ विश्वास ठेवून सातत्याने आपल्या ब्रँडची निवड करणारा निष्ठावान ग्राहकच व्यवसायाच्या खऱ्या यशाची ओळख असतो.