उद्योजक व्हायचं आहे? मग हे 5 महत्वाचे गुण असणं गरजेचं..
आजघडीला प्रत्येकाला उद्योजक व्हायचं आहे, त्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत आहेत. मात्र, उद्योजकता म्हटलं की दृष्टी, जोखीम आणि सुलभतेचा त्रिवेणी संगम आहे. त्यामुळे आजच्या या वेगाने बदलत असलेल्या व्यवसायाच्या वातावरणात उद्योजक होण्यासाठी फक्त चांगली कल्पना असून चालत नाही. तर त्याबरोबर अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी, बदलांशी जुळवून घेण्यासाठी आणि सतत नवनवीन प्रयोग करण्यासाठी आंतरिक शक्ती असणंही आवश्यक आहे. तसेच, बाजारपेठेतील स्थिती, तंत्रज्ञान आणि निधी यासारखे बाह्य घटक महत्त्वाचे असले तरी, उद्योजकाचे खरे यश त्याच्या वैयक्तिक गुणांवर, मूल्यांवर आणि मानसिकतेवर अवलंबून असते.
म्हणून नवीन स्टार्टअप सुरू करू इच्छिणाऱ्या आणि काहीतरी अर्थपूर्ण घडवण्याचे स्वप्नं पाहणाऱ्या तरुण व्यावसायिकांनी खालील 5 गुणांविषयी जाणून घेणं गरजेचं आहे..
दृष्टी आणि ध्येयाची स्पष्टता
उद्योजक म्हणून पुढे येऊ पाहणाऱ्या व्यक्तिकडे दृष्टी असणं आवश्यक आहे. म्हणजेच तुम्ही काय करत आहात, ते का महत्वाचं आहे हे तुम्हाला माहिती असायला हवं. कारण, हीच स्पष्टता तुम्हाला कठीण काळात अचूक दिशा दाखवते. तसेच, स्पष्ट ध्येय असलेला उद्योजक प्रत्येक संधीच्या मागे धावत नाही, तर आपल्या मूल्यांशी सुसंगत असलेल्या गोष्टींवरच लक्ष केंद्रित करतो.
विशेष म्हणजे स्टार्टअपच्या सुरुवातीच्या काळात, ही स्पष्टता एका अॅंकरप्रमाणे काम करते. तुम्हाला धोरणात्मक निर्णय घेणं, कंपनीच्या संस्कृतीला आकार देणं आणि इतरांना ध्येयावर विश्वास ठेवण्यास प्रेरित करते. त्यामुळे भारताच्या वेगवान स्टार्टअप इकोसिस्टममध्ये, जिथे स्पर्धा तीव्र आहे आणि नाविन्यपूर्ण बदल वेगाने घडतात, तिथे एक सुस्पष्ट उद्देश उद्योजकाला इतरांपेक्षा वेगळे ठरवू शकतो. त्यामुळे उद्योजक म्हणून यशस्वी व्हायचं असल्यास दृष्टी आणि स्पष्टता माहिती असणं आवश्यक आहे. तेव्हाच कितीही अडचणी आल्या तरी त्यातून सहज मार्ग काढता येतो.
सुलभता आणि अनुकूलता
यशस्वी उद्योजक आणि अपयशी ठरलेले लोक यांच्यात 'सुलभता' हाच मुख्य फरक असतो. व्यवसायात चढ-उतार येणारच; पण त्यातून सावरून पुन्हा उभे राहण्याची क्षमता महत्त्वाची आहे. त्यामुळे भारतामध्ये नवीन स्टार्टअप सुरू करणाऱ्या उद्योजकामध्ये सुलभता असणं गरजेच आहे. कारण, इथे नियम आणि ग्राहकांच्या आवडी वेगाने बदलतात. अशा वेळी जे उद्योजक नवीन परिस्थितीनुसार स्वतःच्या व्यावसायिक मॉडेलमध्ये बदल करतात, त्यानुसार अनुकूल होतात, तेच टिकून राहतात.
याचबरोबर अनुकूलतेमध्ये अभिप्रायालाही जागा देणं आवश्यक आहे. त्यातून आपल्याला अनेक गोष्टी शिकता येतात. म्हणून, अपयशाला शेवट न मानता ती शिकण्याची संधी मानणे हीच खरी उद्योजकता आहे.
नेतृत्व आणि संवादाचं कौशल्य
प्रत्येक यशस्वी उद्योजकाच्या मागे एक खंबीर नेतृत्व असत, जे इतरांना प्रेरित आणि मार्गदर्शन करणार असत. त्यामुळे नेतृत्व म्हणजे केवळ अधिकार गाजवणे नव्हे, तर विश्वास निर्माण करणे आणि सर्वांना सोबत घेऊन चालणे होय. असंच भारी नेतृत्व सर्वांना एकत्र आणतं, खेळी-मेळीच वातावरण तयार करून सर्वांना आपल्या आयडिया मांडण्यासाठी मोकळीक देत. याचबरोबर सर्वांना ध्येय प्राप्त करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात निष्णात असतं.
तरुण संस्थापकांसाठी नेतृत्वाचा 'मानवी पैलू' समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. व्यवसाय उभा करणे हे केवळ उत्पादन विकसित करणे किंवा निधी मिळवण्यापुरते मर्यादित नसून, ते लोकांशी योग्य समन्वय साधण्याबद्दलही आहे. प्रभावी संवाद साधणे, संघर्षातून वाट काढणे आणि कठीण काळात टीमला प्रोत्साहित करणे, हेच खऱ्या नेतृत्वाचे लक्षण आहे. भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशात, जिथे कार्यबल वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आणि मानसिकतेतून येते, तिथे 'भावनिक बुद्धिमत्ता' हे उद्योजकाचा महत्वाचा गुण ठरते. जे नेते आपल्या टीमचे म्हणणे ऐकून घेतात, त्यांना समजून घेतात आणि त्यांना सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी सक्षम करतात, तेच सर्वाधिक प्रभावी ठरतात..
आर्थिक शिस्त आणि धोरणात्मक विचार
पॅशनही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला तुमच्या आवडीच्या कामात व्यस्त ठेवते.. हे खरं असलं तरी ती पॅशन जिवंत ठेवण्यासाठी आर्थिक शिस्त असणं आवश्यक आहे. शिवाय, उद्योजकाकडे फक्त क्रिएटिव्ह आयडिया असून चालत नाही, तर संसाधनांचे योग्यरित्या व्यवस्थापन करण्याचे व्यावहारिक ज्ञानही असणे आवश्यक आहे. याचबरोबर, धोरणात्मक विचारामध्ये जोखमीचे मूल्यांकन करणे, आपत्कालीन परिस्थितीसाठी नियोजन करणे आणि भावनेपेक्षा डेटाच्या आधारावर निर्णय घेण्याचं कौशल्यही असायला हवं.
स्टार्टअप्ससाठी, विशेषतः सुरुवातीच्या काळात जेव्हा कॅशफ्लो कमकुवत असतो, तेव्हा आर्थिक काटकसर व्यवसायाचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी निर्णायक ठरू शकते. जे उद्योजक खर्च आणि बचत यातील समतोल साधू शकतात, ते अनिश्चित काळातही आपला व्यवसाय टिकवून ठेवण्यास अधिक सक्षम असतात. ही शिस्त केवळ वित्तीय गोष्टींपुरती मर्यादित नसून, वास्तववादी उद्दिष्टे निश्चित करणे, प्रगतीचा मागोवा घेणे आणि माहितीवर आधारित धोरणात्मक निवडी करणे यातही महत्त्वाची ठरते. भारताच्या वेगाने विस्तारणाऱ्या अर्थव्यवस्थेत, जिथे गुंतवणुकीच्या संधी वाढत आहेत, तिथे महत्त्वाकांक्षा आणि चोख नियोजन व जबाबदारी यांची सांगड घालणारे उद्योजकच सर्वाधिक यशस्वी ठरत आहेत.
शिक्षणात सातत्य आणि इनोव्हेशन
उद्योजकाची सर्वांत मोठी ताकत म्हटलं तर त्याच्यातील सतत काहीतरी नवीन शिकत राहण्याची उर्मी होय. कारण, तंत्रज्ञानाला वेगाने आत्मसात केलेल्या या जगात, नाविन्य ही आता चैनीची गोष्ट राहिली नसून ती गरज बनली आहे. जे उद्योजक एखादी गोष्ट जाणून घेण्यासाठी उत्साही असतात, नवीन आयडियासाठी तयार असतात ते इतरांच्या आधी चालू ट्रेंड ओळखण्यात आणि संधींचे सोने करण्यात अधिक सक्षम असतात.
शिकणे हे केवळ शिक्षणापुरते मर्यादित नसते. तुम्ही अखेरपर्यंत काहीना काहीतरी शिकत असता. मग बाजाराचे निरीक्षण करणे, मार्गदर्शकांकडून सल्ला घेणे, स्पर्धकांचा अभ्यास करणे आणि ग्राहकांच्या गरजा समजून घेणं, यातूनही बरंच काही शिकायला मिळतं. विशेष म्हणजे इनोव्हेटिव्ह उद्योजकांना जोपर्यंत योग्य मार्ग सापडत नाही, तोपर्यंत ते सातत्याने प्रयोग करत राहतात.. त्यांच्या टेस्ट घेताता आणि आयडियांना आणखी प्रगल्भ करत राहतात. तसेच, ट्रेंडसोबत स्वत:ला अपडेट करत राहतात.
उद्योजकीय मानसिकता यशाचा मार्ग
वरील पाचही गुण वेगवेगळे असले तरी ते एकमेकांशी घट्ट जोडलेले आहेत. दृष्टी आपल्याला दिशा देते, चिकाटी प्रवासात टिकून राहण्याची ताकद देते, नेतृत्व लोकांना एकत्र आणायला मदत करते, आर्थिक शिस्त ग्रोथ टिकवून ठेवते आणि सतत शिकण्याची वृत्ती नवकल्पनांना चालना देते. हे सर्व गुण एकत्र आले की, उद्योजकीय मानसिकतेची मजबूत पायाभरणी होते. अशी मानसिकता असलेलं नेतृत्व आव्हानांना सामोरे जाऊन अपयशातून शिकते आणि सतत आणखी चांगलं करण्याकडे वाटचाल करत राहते.
उद्योजकता म्हणजे फक्त व्यवसाय सुरू करणे नाही. ती आपल्या मूल्यांशी प्रामाणिक राहून समाजासाठी अर्थपूर्ण काहीतरी घडवण्याची प्रक्रिया आहे. भारतासारख्या देशात, जिथे नवकल्पना आर्थिक परिवर्तनाला वेग देत आहेत, तिथे उद्योजकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक गुणांवर फक्त त्यांच्या उद्योगाचे यश अवलंबून नसते, तर देशाच्या प्रगतीलाही दिशा मिळते.
उद्योजकाचा प्रवास सोपा नसतो, पण योग्य गुण जोपासले तर तो नक्कीच समाधानकारक ठरतो. दृष्टी, चिकाटी, नेतृत्व, शिस्त आणि नवकल्पना हे जन्मतः मिळणारे गुण नाहीत. ते शिकता येतात, विकसित करता येतात आणि वेळेनुसार अधिक सक्षम बनवता येतात. प्रत्येक तरुण उद्योजकाने आणि स्टार्टअपची स्वप्ने पाहणाऱ्याने हे गुण जोपासले,
शेवटी, उद्योजकतेची ओळख व्यवसायाच्या आकाराने होत नाही, तर उद्दिष्ट काय आहे आणि ते कशा पद्धतीने पूर्ण केलं यावरून ठरते. तसेच, जो उद्योजक स्पष्ट दृष्टीसोबत धाडस, उत्साहासोबत चिकाटी आणि नवकल्पनांसोबत प्रामाणिकपणाने प्रयत्न करत राहतोस यश त्यांच्याच पाठीशी आपोआप उभे राहते. हेही तेवढंच खरं आहे..